क्राईम रिपोर्ट

बारामतीत गावठी पिस्तुल अन् जिवंत काडतूस; तांबे नगरात LCBची धडक कारवाई

करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट

बारामतीत गावठी पिस्तुल अन् जिवंत काडतूस; तांबे नगरात LCBची धडक कारवाई

करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ₹41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. लिमटेक, म्हसोबा मंदिराच्या मागे राहणारा श्रेयश अमोल शिंदे हा तांबे नगर परिसरात गावठी पिस्तुल जवळ बाळगून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खात्री करून LCBच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर शिताफीने श्रेयश शिंदे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ₹41 हजार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार पोपट नाळे, ब.नं. 2357 यांनी फिर्याद दिली असून संबंधिताविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहायक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, सुलतान डांगे, पोपट नाळे, सचिन होळकर तसेच पोलीस अंमलदार गणेश डेरे, रहिस मुलाणी आणि तुषार चव्हाण यांनी सहभाग घेतला.

गावठी पिस्तुल बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Back to top button