सोमेश्वर

‘किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही!’ सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचा सूचक इशारा; ‘शिट्टीपासून सावध राहा’

बाहेरील शक्ती हस्तक्षेप करू पाहत आहेत’

‘किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही!’ सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचा सूचक इशारा; ‘शिट्टीपासून सावध राहा’

‘बाहेरील शक्ती हस्तक्षेप करू पाहत आहेत’

बारामती वार्तापत्र 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून निवडणूक चिन्हांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांना धार येऊ लागली आहे. सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करताना युगेंद्र पवार यांनी ‘किटली’, ‘कप-बशी’ आणि ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हांचा सांकेतिक संदर्भ देत सभासदांना सावध राहण्याचे आवाहन केले.

‘किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत शिट्टीपासून सावध राहा,’ असे सूचक आवाहन युगेंद्र पवार यांनी केले.

सोमेश्वर मंदिरात पूजा व आरती करून सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभासदांशी संवाद साधताना पवार यांनी पॅनलचे निवडणूक चिन्ह ‘किटली’ असल्याचे सांगत विरोधी चिन्हांचा संदर्भ घेत आपली भूमिका मांडली.

‘शिट्टीचा आवाज ओळखून सावध राहा’

युगेंद्र पवार म्हणाले, ‘किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही, ही गोष्ट सभासदांनी लक्षात ठेवावी. कारखान्याच्या कारभारात बाहेरील शक्ती हस्तक्षेप करू पाहत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर शिट्टी वाजवली जात आहे. त्यामुळे या शिट्टीचा आवाज ओळखून सावध राहण्याची गरज आहे.’

त्यांच्या या वक्तव्यामुळे सोमेश्वरच्या निवडणूक प्रचारातील चिन्हांची लढत अधिक चर्चेत आली आहे.

‘कारखान्याला शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज’

युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले.

‘शरदचंद्रजी पवार यांचा सोमेश्वर कारखान्याशी जुन्या काळापासून संबंध आहे. अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार यांनी कारखान्याला मदत केली. त्यांच्या योगदानामुळे कारखान्याची वाटचाल झाली. आता शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाची कारखान्याला गरज आहे,’ असे ते म्हणाले.

सहकार क्षेत्रातील अनुभव तसेच वरिष्ठ पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘मी स्वतः कारखान्यासाठी वेळ देणार’

कारखान्याच्या कारभाराबाबत आश्वासन देताना पवार म्हणाले की, ‘मी स्वतः कारखान्यासाठी वेळ देऊन मदत करणार असून कारखाना योग्य पद्धतीने चालविण्याची खात्री देतो.’

पॅनलमधील नवीन आणि अनुभवी उमेदवारांचा योग्य समन्वय साधून कारखान्याच्या कामकाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नवीन- अनुभवी उमेदवारांचा समन्वय साधण्याचा दावा

यावेळी युगेंद्र पवार यांनी पॅनलमधील उमेदवारांची सभासदांना ओळख करून दिली. सर्व उमेदवार सुशिक्षित असून अनुभवी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

‘शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा आणि आशीर्वादाचा कारखान्याला लाभ मिळणे आवश्यक आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

सोमेश्वर निवडणुकीच्या प्रचारात आता निवडणूक चिन्हे, कारखान्याच्या कारभाराचा अनुभव, बाहेरील हस्तक्षेपाचा मुद्दा आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन हे मुद्दे केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत प्रचाराला आणखी राजकीय धार येण्याची शक्यता आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, सतीश खोमणे, एस. एन. जगताप, प्रदीप गीते, सुरेश खलाटे, दत्तात्रय चव्हाण, वनिता बनकर यांच्यासह पॅनलचे उमेदवार आणि सभासद उपस्थित होते.

Back to top button