इंदापूरस्थानिक

बारामती-इंदापूर मार्गावर ‘लालपरी’चा अजब कारभार! तिकीट मशीन बंद पडले अन् प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवले

‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ म्हणायचे तरी कसे?

बारामती-इंदापूर मार्गावर ‘लालपरी’चा अजब कारभार! तिकीट मशीन बंद पडले अन् प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवले

‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ म्हणायचे तरी कसे?

बारामती वार्तापत्र 

इंदापूर-बारामती मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. तिकीट काढण्यासाठी वापरले जाणारे मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणापूर्वीच अर्ध्या रस्त्यात उतरवण्यात आल्याचा प्रकार भवानीनगर येथील शेरपुलाजवळ घडला. या घटनेमुळे वृद्ध, महिला तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर आगाराची बारामती-इंदापूर बस दुपारी सुमारे ३.३० वाजता बारामतीहून इंदापूरच्या दिशेने निघाली होती. बस भवानीनगर परिसरातील शेरपुलाजवळ पोहोचली असता वाहकाकडील तिकीट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मशीनमधून तिकीटाची पावती निघत नसल्याने लिमटेक आणि काटेवाडी येथून बसमध्ये चढलेल्या काही प्रवाशांची तिकिटे काढणे बाकी होते.

मशीन सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. त्यानंतर चालक आणि वाहकाने मशीन बंद असल्याचे कारण देत प्रवाशांना बसमधून खाली उतरवले, अशी माहिती प्रवाशांनी दिली.

गावापूर्वीच उतरवले; प्रवाशांचे हाल

विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच प्रवाशांना उतरवण्यात आल्याने त्यांना पुढील प्रवासासाठी इतर वाहनांची वाट पाहावी लागली. सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतर आधीच प्रवाशांना उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यामध्ये वृद्ध नागरिक, महिला आणि नोकरदार प्रवाशांची विशेष गैरसोय झाली. उन्हात रस्त्यावर उभे राहून पुढील वाहनाची प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

‘मशीन बंद पडले तर प्रवाशांची काय चूक?’

तिकीट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होणे ही यंत्रणेतील समस्या असू शकते; मात्र त्याचा फटका प्रवाशांना का बसावा, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला आहे. मशीन बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था करून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची नाही का? असा प्रश्नही प्रवाशांनी उपस्थित केला.

बस नादुरुस्तीच्या तक्रारींनंतर आता तिकीट मशीनचा प्रश्न

इंदापूर-बारामती मार्गावर बस नादुरुस्त होणे, रस्त्यात बस बंद पडणे अशा प्रकारांबाबत यापूर्वीही प्रवाशांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. आता तिकीट मशीनच्या बिघाडामुळे प्रवाशांना रस्त्यात उतरवण्यात आल्याने एसटीच्या व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ हे महामंडळाचे ब्रीदवाक्य असले तरी अशा घटनांमुळे प्रत्यक्ष प्रवासातील अडचणी समोर येत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे

बारामती-इंदापूर मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील बसची स्थिती, तिकीट मशीनची उपलब्धता आणि तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था याबाबत एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मशीन बंद पडले म्हणून प्रवाशांना रस्त्यावर उतरवण्याऐवजी त्यांची गैरसोय होणार नाही, अशी पर्यायी व्यवस्था कधी होणार? हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Back to top button