सोमेश्वर निवडणुकीत नवा ट्विस्ट! पुरुषोत्तम जगतापांवर कारवाई होणार; जय पवारांचा थेट इशारा
दादांचा फोटो, सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ अन् आवाज वापरल्याचा आरोप

सोमेश्वर निवडणुकीत नवा ट्विस्ट! पुरुषोत्तम जगतापांवर कारवाई होणार; जय पवारांचा थेट इशारा
दादांचा फोटो, सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ अन् आवाज वापरल्याचा आरोप
‘काय कारवाई करायची, ते पक्षाच्या बैठकीत ठरवू’; जगतापांसोबत गेलेल्या इतरांवर मात्र कारवाई नसल्याचे जय पवारांचे स्पष्टीकरण
बारामती वार्तापत्र
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्यावर पक्षाच्या वतीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी दिली आहे.
जगताप यांनी प्रचारासाठी अजित पवार यांचा फोटो व आवाज तसेच सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरल्याचा आरोप जय पवार यांनी केला. यामुळे पक्षाच्या पातळीवर कारवाई करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जय पवार म्हणाले, “सुरुवातीला आम्हाला वाटले होते की बंडखोरांवर कारवाई करायला नको. काही दिवसांपूर्वीही मला विचारण्यात आले होते की पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार का? त्यावेळी मी कारवाई करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांना अजितदादांचे नाव आणि फोटो वापरू नयेत, असे स्पष्ट सांगण्यात आले होते.”
मात्र त्यानंतरही प्रचारामध्ये अजित पवारांचा आवाज असलेला व्हिडिओ तसेच सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ वापरला जात असल्याचा दावा जय पवार यांनी केला. त्यामुळे आता पक्षाच्या वतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आज सायंकाळपर्यंत निर्णय कळेल’
जय पवार यांनी सांगितले की, “नेमकी काय कारवाई करायची, हे पक्षाची बैठक घेऊन ठरवले जाईल. आज सायंकाळपर्यंत याबाबत माहिती कळेल. मात्र पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई होणार आहे.”
त्याचवेळी जगताप यांच्यासोबत गेलेल्या इतर पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“जगताप यांच्यासोबत जे गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार नाही. कारण ही सुरुवात एका व्यक्तीमुळे झाली आहे,” असे जय पवार म्हणाले.
‘जगतापांच्या मनात हे आधीपासूनच होते?’
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक भाजप संघटनेत फूट पाडून बारामतीच्या सहकार क्षेत्रात राजकीय शिरकाव करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल जय पवार यांना करण्यात आला.
यावर त्यांनी जगताप यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत आपली भूमिका मांडली.
“२८ तारखेला पुरुषोत्तम जगताप आले होते. त्यांनी १६ नावे दिली. त्यानंतर आम्ही सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली. २९ तारखेला पहाटे दोन वाजता पुन्हा भेट झाली. सुनेत्रा पवारही त्यावेळी उपस्थित होत्या. नवीन पॅनल तयार करून अंतिम करण्यात आले होते,” असे जय पवार यांनी सांगितले.
मात्र त्यानंतर जगताप यांचे दौरे आणि प्रचारातील भूमिका पाहता त्यांच्या मनात हे आधीपासूनच होते, असा आरोप जय पवार यांनी केला.
‘आमचा फोकस कारखाना व्यवस्थित चालवण्यावर’
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वसमावेशक पॅनल तयार करण्यात आल्याचा दावा जय पवार यांनी केला.
“आम्ही सर्वसमावेशक पॅनल केला आहे. यात उमेश पाटील यांचा रोल नाही. सुनेत्रा पवार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा पॅनल तयार केला आहे. कारखाना व्यवस्थित कसा चालवायचा, हा आमचा मुख्य फोकस आहे,” असे ते म्हणाले.
कारखान्याच्या कारभारात भविष्यात काही चूक झाली तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
‘प्रचारात दादांवरचे प्रेम दिसत आहे’
सोमेश्वरच्या प्रचाराला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत बोलताना जय पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे सांगितले.
“आत्ताचा प्रचार पाहता सर्वांचे प्रेम दादांवर आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक लोक प्रचारात सहभागी होत आहेत. आजूबाजूला मला हसरे चेहरे दिसत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देणारे काही लोक त्याचवेळी आपल्या बाजूलाही असल्याचे जय पवार यांनी नमूद केले.
सोमेश्वरच्या निवडणुकीत संघर्ष तीव्र
एकीकडे पॅनलची मोर्चेबांधणी, दुसरीकडे प्रचारातील आरोप-प्रत्यारोप आणि आता अजित पवार यांच्या नाव-फोटो व आवाजाच्या वापरावरून निर्माण झालेला वाद यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
आता पक्षाच्या बैठकीत पुरुषोत्तम जगताप यांच्याविरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे सोमेश्वरच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.






