“दूधाच्या नावाखाली रसायनांचा खेळ! मंचरच्या भेसळीची साखळी सोलापूरमार्गे इंदापूरच्या ‘सोनाई डेअरी’पर्यंत”
FDA ने उघडली भेसळखोरांची कुंडली; ‘सोनाई डेअरी’पर्यंत पोहोचले भेसळयुक्त दूध

“दूधाच्या नावाखाली रसायनांचा खेळ! मंचरच्या भेसळीची साखळी सोलापूरमार्गे इंदापूरच्या ‘सोनाई डेअरी’पर्यंत”
FDA ने उघडली भेसळखोरांची कुंडली; ‘सोनाई डेअरी’पर्यंत पोहोचले भेसळयुक्त दूध
मंचर : प्रतिनिधी
दिसायला शुभ्र, पण आतून घातक रसायनांचा खेळ! दूधामध्ये पाण्याची भेसळ केली जाते, ही जुनीच बाब; मात्र आता त्यापुढे जाऊन डिटर्जंट, व्हे पावडर, खाद्यतेल, इमल्सिफायर आणि इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम व भेसळयुक्त दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासात समोर आला आहे.
जुलै महिन्यात मंचर परिसरात उघडकीस आलेल्या दूध भेसळीच्या प्रकरणाची व्याप्ती केवळ मंचरपुरती मर्यादित नसून, तपासाची साखळी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पुढे इंदापूरपर्यंत पोहोचल्याचे प्रशासनाच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात ३७ आरोपी निष्पन्न झाले असून २५ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर १२ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
मंचरमध्ये कारवाई; भेसळीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त
गोपनीय माहितीच्या आधारे ४ जुलै रोजी FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील नवकार डिस्ट्रीब्यूटर्सवर कारवाई केली. या कारवाईत व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, डिटर्जंट, इमल्सिफायर यांसह दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
विविध कंपन्यांच्या नावाने असलेल्या पावडरी आणि भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे नमुनेही घेण्यात आले. या कारवाईनंतर सुरू झालेल्या सखोल तपासात भेसळीच्या दुधाची तयार करण्यापासून ते त्याचा पुढे पुरवठा करण्यापर्यंतची साखळी तपास यंत्रणेच्या हाती लागली.
SNF, प्रथिने आणि फॅट वाढविण्यासाठी रसायनांचा वापर
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दुधातील एसएनएफ वाढविण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, प्रथिनांशी संबंधित घटक वाढविण्यासाठी व्हे पावडर, तर फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी खाद्यतेलाचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले.
विविध घटक एकत्र मिसळण्यासाठी इमल्सिफायर आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे ‘दूध’ म्हणून बाजारात जाणाऱ्या या पांढऱ्या द्रावणामागे नेमका कोणता रासायनिक खेळ सुरू होता, याचा तपास FDAकडून करण्यात येत आहे.
मंचरमधील नमुन्यांत डिटर्जंट
तपासादरम्यान मंचर येथील आकाश डेअरी फार्मच्या सहा नमुन्यांमध्ये डिटर्जंट आढळल्याचे समोर आले. तसेच अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीजच्या दुधाच्या नमुन्यातही डिटर्जंट आढळल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या निष्कर्षांमुळे दूध भेसळीचा प्रकार किती खोलवर रुजलेला आहे, याकडे तपास यंत्रणेचे लक्ष वेधले गेले.
सुशांत हिंगे मुख्य आरोपी; पुढे सोलापूरमार्गे इंदापूरपर्यंत साखळी
तपासात सुशांत बबनराव हिंगे याचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आले आहे. तपास यंत्रणेने उघड केलेल्या साखळीनुसार, हिंगे हा पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील सोनू ऊर्फ चैतन्य अरुण घोरपडे याला भेसळयुक्त दूध पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.
पुढे हे दूध पिलीव, माळशिरस येथील महालक्ष्मी मिल्क अँड प्रोडक्ट्स आणि योगीनाथा मिल्क सप्लायर्स यांच्या माध्यमातून गोखळी, ता. इंदापूर येथील सोनाई डेअरी (इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स) पर्यंत टँकरद्वारे पोहोचत असल्याचे तपासात समोर आले आहे.
इतकेच नव्हे तर होळेवाडी, ता. खेड येथील अवजा दूध संकलन केंद्रातून आनंदा मारुती पवार हा देखील सोनाई डेअरीला भेसळयुक्त दूध पोहोचवत असल्याची माहिती तपासात पुढे आली असून, तो मुख्य आरोपी सुशांत हिंगेच्या संपर्कात असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
३७ आरोपींची साखळी; २५ जणांवर आरोपपत्र
मंचर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यामध्ये भेसळीसाठी लागणाऱ्या पदार्थांचे पुरवठादार, औद्योगिक रसायनांचे पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रांशी संबंधित व्यक्ती तसेच दूध व्यावसायिकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापैकी २५ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर १२ आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
फक्त दूध कुठे गेले, एवढाच तपास नाही!
या प्रकरणात FDAने तपासाची व्याप्ती केवळ भेसळयुक्त दूध सापडलेल्या ठिकाणांपुरती मर्यादित ठेवलेली नाही. भेसळीसाठी वापरले जाणारे पदार्थ कोणी पुरवले, कोणी खरेदी केले, त्यांचा वापर कुठे झाला, दूध कुठे तयार झाले आणि कोणत्या मार्गाने कोणापर्यंत पोहोचले, याचा सखोल तपास सुरू आहे.
या संपूर्ण साखळीतील आर्थिक व्यवहार तसेच डिजिटल पुरावेही तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती असून, या प्रकरणात स्वतंत्र आर्थिक तपास सुरू करण्यात आला आहे.
‘पांढऱ्या’ दुधामागचा काळा धंदा उघडकीस आणण्याचे आव्हान
दूध हा बालके, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दुधात घातक पदार्थ मिसळून त्याची विक्री होत असल्यास हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित राहत नाही, तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करतो.
FDAच्या तपासामुळे मंचरपासून सोलापूरच्या माळशिरस आणि पुढे इंदापूरपर्यंत पोहोचलेल्या कथित भेसळीच्या साखळीतील अनेक दुवे समोर आले आहेत. आता या साखळीमागील आर्थिक व्यवहार, भेसळीचे साहित्य पुरवणारे घटक आणि भेसळयुक्त दूध नेमके किती मोठ्या प्रमाणावर बाजारात गेले, याचा तपास निर्णायक ठरणार आहे.
“भेसळयुक्त दूध नेमके कुठे सापडले, यापुरता तपास मर्यादित न ठेवता भेसळीसाठी वापरलेले पदार्थ कोणी पुरविले, कोणी खरेदी केले, त्यांचा वापर कुठे झाला आणि ते पुढे कोठे गेले, याचा माग काढला जात आहे. या साखळीतील मोठ्या आर्थिक व्यवहारांची आणि डिजिटल पुराव्यांची माहिती प्रशासनाच्या हाती लागली असून, स्वतंत्र आर्थिक तपास सुरू आहे.”
— तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन






