कृषी

बारामती, इंदापूर, दौंडसह आठ तालुक्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; चारा वाहतुकीवर निर्बंध

कडबा, कुट्टी, पेंढा अन् हिरवा चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हा प्रशासनाचा आदेश

बारामती, इंदापूर, दौंडसह आठ तालुक्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; चारा वाहतुकीवर निर्बंध

कडबा, कुट्टी, पेंढा अन् हिरवा चारा बाहेर नेण्यास बंदी; जिल्हा प्रशासनाचा आदेश

पुणे : प्रतिनिधित

जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, कडबा, कुट्टी आणि पेंढा यांची वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्यावर भर

पुणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागांत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत.

कडबा, कुट्टी आणि पेंढ्याचाही समावेश

या आदेशानुसार सुका व ओला चारा यांसह कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

आदेश मोडल्यास कायदेशीर कारवाई

जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे चारा उत्पादक, व्यापारी आणि वाहतूकदारांनी या आदेशाची नोंद घेऊन त्याचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू

सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली असून, पुढील आदेश जारी होईपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि संभाव्य टंचाई टाळणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

 

 

Back to top button