१२ एकर ऊस जळाला; सभासदांच्या मदतीला माळेगावचे शिलेदार धावले! नितीनदादा शेंडे, योगेशभैया जगताप थेट बांधावर!
पंचनामे करण्याच्या सूचना; ऊसतोडणीचे नियोजन

१२ एकर ऊस जळाला; सभासदांच्या मदतीला माळेगावचे शिलेदार धावले! नितीनदादा शेंडे, योगेशभैया जगताप थेट बांधावर!
पंचनामे करण्याच्या सूचना; ऊसतोडणीचे नियोजन
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील भिकोबानगर येथे सोमवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारांवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जगताप, धायगुडे, कोकरे आणि मोरे परिवारांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीनदादा शेंडे, अभ्यासू संचालक योगेशभैया जगताप आणि कामगार संचालक चंद्रशेखर जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी मदतकार्य केले.
१२ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
भिकोबानगर परिसरात दुपारी अचानक आग लागल्याने शेतातील उसाने पेट घेतला. विजेच्या तारांवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमध्ये जवळपास १२ एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याने संबंधित शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. कष्टाने वाढवलेले ऊस पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पंचनामे करण्याच्या सूचना; ऊसतोडणीचे नियोजन
घटनास्थळी दाखल झालेल्या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त उसाचे तातडीने पंचनामे करण्यास सांगितले. तसेच जळालेल्या उसाची ऊसतोडणी तातडीने करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सभासदांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
आगीमुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असताना कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. जळालेल्या उसाचे पंचनामे, ऊसतोडणी आणि पुढील कार्यवाही वेळेत होणे महत्त्वाचे ठरणार आहे. विजेच्या तारांमधील बिघाडामुळे आग लागल्याचे अधिकृत तपासात स्पष्ट झाल्यास संबंधित यंत्रणेनेही योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.






