‘नशामुक्त युवा, विकसित भारत’चा संदेश! बारामतीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा उत्साह!
पाच कलाप्रकारांतून युवकांच्या प्रतिभेला मिळाले व्यासपीठ; ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’चा संदेश

‘नशामुक्त युवा, विकसित भारत’चा संदेश! बारामतीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा उत्साह!
पाच कलाप्रकारांतून युवकांच्या प्रतिभेला मिळाले व्यासपीठ; ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’चा संदेश
बारामती वार्तापत्र
युवकांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ बारामती येथील टी.सी. कॉलेजमध्ये उत्साहात पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातील सुमारे १५० युवक-युवतींनी सहभाग घेत विविध कलाप्रकारांतून आपली प्रतिभा सादर केली. समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन अशा पाच कलाप्रकारांनी महोत्सवाला रंगत आणली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, नेहरू युवा केंद्र, पुणे, टी.सी. कॉलेज, बारामती आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन
महोत्सवाचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर आसी आणि टी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. युवकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.
युवकांमध्ये एकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारे व्यासपीठ
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी युवा महोत्सव हे युवकांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास निर्माण करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून ज्ञानार्जनाची आवड जोपासावी. तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असून, अशा उपक्रमांमुळे त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना मिळते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’चा संदेश
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास टी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी व्यक्त केला.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, हा महोत्सवामागील महत्त्वपूर्ण उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची माहिती
क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी युवा महोत्सवाच्या आयोजनाची जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतची माहिती दिली. अशा स्पर्धांमधून युवकांना आपली कला सादर करण्याची आणि पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळते. सहभागी स्पर्धकांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घ्यावा, असे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विजेत्यांचा सन्मान; व्यसनमुक्त जीवनाचा संदेश
महोत्सवातील विविध कलाप्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम, कलाकार रामभाऊ जगताप आणि सुभाषराव मदने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम यांनी युवकांनी चांगल्या सवयी जोपासून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन केले. युवकांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. महेश चावले, तालुका क्रीडा अधिकारी, इंदापूर आणि स्पर्धा समन्वयक प्रा. भीमराव तोरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कला, संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






