बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा खळबळ! सहाव्या मजल्यावरून रुग्णाची उडी; उपचारादरम्यान मृत्यू!
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा खळबळ! सहाव्या मजल्यावरून रुग्णाची उडी; उपचारादरम्यान मृत्यू!
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न महिला रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रणजीत दत्तात्रय शितोळे (वय ४५) यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. बारामतीतील हे शासकीय रुग्णालय विविध कारणांमुळे यापूर्वीही चर्चेत राहिले आहे. त्यातच आज उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाने रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याच्या घटनेने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, रुग्णांची देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालय प्रशासन या घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणार का? रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बारामती तालुका पोलीस स्टेशनकडून अधिक तपास सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.
टीप : ही प्राथमिक माहिती असून, पोलिसांचा अधिकृत तपास व रुग्णालय प्रशासनाची भूमिका समोर येणे बाकी आहे.






