स्थानिक

बारामतीत दिवाळीतच स्वच्छतेचा फज्जा! बोनससाठी कर्मचारी रस्त्यावर; मुख्याधिकारी हातात झाडू घेऊन मैदानात!

स्वच्छतेचा प्रश्न आता प्रतिष्ठेचा बनला आहे.

बारामतीत दिवाळीतच स्वच्छतेचा फज्जा! बोनससाठी कर्मचारी रस्त्यावर; मुख्याधिकारी हातात झाडू घेऊन मैदानात!

स्वच्छतेचा प्रश्न आता प्रतिष्ठेचा बनला आहे.

बारामती वार्तापत्र

दिवाळीच्या सणात बारामती नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. दिवाळीचा बोनस मिळाला नसल्याच्या कारणावरून NDK कंपनीअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी थेट काम बंद आंदोलन पुकारले आहे. ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी काम थांबवल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व कंत्राटी कर्मचारी एकत्र आले. एकजूट दाखवत त्यांनी आंदोलन सुरू केले. वर्षभर शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिवाळीचा बोनस मिळत नसेल, तर त्यांच्या सणाचा आनंद हिरावला जात असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त होत आहे.

या आंदोलनामुळे बारामती शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी स्वतः हातात झाडू घेत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शहर अस्वच्छ होऊ देणार नाही, असा निर्धार करत त्यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामात सहभाग घेतला. मुख्याधिकाऱ्यांनाच झाडू घेऊन रस्त्यावर उतरावे लागल्याने बारामतीत या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे नगरपरिषदेच्या कंत्राटी व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची जबाबदारी नेमकी NDK कंपनीची की नगरपरिषदेची? कंत्राटदाराकडून कामगारांच्या हक्कांची पूर्तता केली जाते का? वर्षभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात बोनससाठी आंदोलन करण्याची वेळ का आली? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

बोनसबाबत Payment of Bonus Act, 1965 अंतर्गत लागू होणाऱ्या तरतुदी आणि कर्मचाऱ्यांची पात्रता तपासणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदाराने कामगारांना लागू असलेले वैधानिक लाभ दिले आहेत की नाही, याचीही कामगार विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे.

एका बाजूला बोनससाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, तर दुसऱ्या बाजूला मुख्याधिकाऱ्यांच्या हातात झाडू! बारामतीच्या स्वच्छतेचा प्रश्न आता प्रतिष्ठेचा बनला आहे. मुख्याधिकारी रस्त्यावर उतरले, पण कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा कधी निघणार? NDK कंपनी आणि नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेणार? कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार की आंदोलन आणखी तीव्र होणार? याकडे आता संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button