दिवाळीच्या गोडधोडात भेसळीचा संशय! ३४.१७ लाखांचा खाद्यसाठा जप्त; बारामतीतील दुकानावरही कारवाई!
कारवाईत ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले

दिवाळीच्या गोडधोडात भेसळीचा संशय! ३४.१७ लाखांचा खाद्यसाठा जप्त; बारामतीतील दुकानावरही कारवाई!
कारवाईत ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले
बारामती वार्तापत्र
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने मिठाई, फरसाण, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. मात्र, याच सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल २५ आस्थापनांवर छापे टाकून ३४ लाख १७ हजार रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत ६८३ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले असून, १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईच्या यादीत बारामतीतील शिवाजी स्वीट्स या आस्थापनेचाही समावेश असल्याने स्थानिक मिठाई व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत ही विशेष तपासणी मोहीम राबवली. पुण्यातील गणेश पेठेतून तब्बल १,७९६ किलो तूप, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ३,१४६.८ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला.
पुणे शहरातील बाणेर, वानवडी, गणेश पेठ, देहू, एरंडवणे, कोथरूड आणि मुंढवा यांसह विविध भागांतील मिठाई व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोतीचूर लाडू, बुंदी, बर्फी, मावा, खवा, तूप, फरसाण आणि ड्रायफ्रूट पदार्थांचा साठा तपासण्यात आला.
बारामतीतील शिवाजी स्वीट्सवरही कारवाई!
या मोहिमेत परवाना निलंबित करण्यात आलेल्या १२ आस्थापनांच्या यादीत बारामतीतील शिवाजी स्वीट्सचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खाद्यपदार्थ बाजारपेठेत या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
परवाना निलंबित केलेल्या आस्थापनांमध्ये न्यू गायत्री ट्रेडर्स, द्वारका स्वीट्स, बालाजी ड्रायफ्रूट्स, अजय वेफर्स (धनकवडी), जय भवानी वेफर्स, न्यू बालाजी बेकर्स (सांगली), श्रीलक्ष्मी फूड प्रॉडक्शन (देहू), ओम् स्वीट्स (निगडी), बालाजी ड्रायफ्रूट (शिरूर), शिवाजी स्वीट्स (बारामती), बंगलोर अय्यंगार बेकर्स (कोल्हापूर) आणि जय गणेश लाडूवाला (पिंपरी-चिंचवड) यांचा समावेश आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, फरसाण, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, उत्पादनस्थळी स्वच्छता राखावी तसेच खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक आणि हाताळणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
श्रीकांत करकळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग यांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.






