राजकीय

‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील!’ सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात विलीनीकरणाचा सस्पेन्स वाढवला!

अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या

‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील!’ सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात विलीनीकरणाचा सस्पेन्स वाढवला!

अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांतील नेत्यांकडून याबाबत वेगवेगळी विधाने केली जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली.

पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता सुनेत्रा पवार यांनी, ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,’ असे उत्तर दिले. त्यांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा नवे वळण मिळाले असून, त्यांनी कोणताही स्पष्ट होकार किंवा नकार दिलेला नाही.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, अशी इच्छा होती, असे शरद पवार गटातील नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने एकत्रीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर दिवाळीनंतर या विषयावर चर्चा करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही महत्त्वपूर्ण विधान करत, अजितदादा हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या, असे म्हटले होते. अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे विलीनीकरणाची चर्चा सध्या मागे पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

या सर्व घडामोडींनंतर सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय कधी होणार, शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात यासंदर्भात चर्चा होणार का, तसेच दोन्ही गटांतील नेत्यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अद्याप विलीनीकरणाबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याने राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा सस्पेन्स कायम आहे.

Back to top button