दुष्काळात सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांसोबत भाऊबीज! सोनकरवस्तीवर झुणका-भाकर अन् अजितदादांच्या स्वप्नांचा निर्धार!
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

दुष्काळात सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांसोबत भाऊबीज! सोनकरवस्तीवर झुणका-भाकर अन् अजितदादांच्या स्वप्नांचा निर्धार!
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
बारामती वार्तापत्र
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भाऊबीजेच्या दिवशी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सोनकरवस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकर खात भाऊबीज साजरी केली. सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरी पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
या भेटीदरम्यान पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोनकरवस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातून तीन वेळा टँकर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून आगामी काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. शासनाकडून मोफत चारा बियाण्यांचे वाटपही करण्यात येत आहे.
यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली का, याचीही विचारणा करण्यात आली. शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीसोबत कर्जमाफी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाल्याचे सांगितले. तसेच सुपे सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांनी पाहिलेली बारामतीच्या विकासाची स्वप्ने आपण सर्वजण एकत्रितपणे पूर्ण करू, असा निर्धारही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पाणी, शेती आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर त्यांनी जोगवाडी येथे शिवाराची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर अंबी येथे शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. अंबी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण भागातील स्केटिंगपटू शिवम नलावडे याने इंडोनेशिया आणि देहराडून येथे मिळविलेल्या यशाबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्याचे कौतुक करून गौरव केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांचा विश्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.






