शैक्षणिक

२८ कलाप्रकारांच्या निवड चाचणीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; बारामतीच्या शिलेदारांची राज्यस्तरावर धडक!

मागील वर्षीही महाविद्यालयाची राज्यस्तरावर चमक!

२८ कलाप्रकारांच्या निवड चाचणीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; बारामतीच्या शिलेदारांची राज्यस्तरावर धडक!

मागील वर्षीही महाविद्यालयाची राज्यस्तरावर चमक!

बारामती वार्तापत्र 

कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या जोरावर बारामतीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर भरारी घेण्याची तयारी केली आहे. अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य २०२६’ युवक महोत्सवाच्या निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ चे आयोजन १८ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची निवड चाचणी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राहुरी येथे पार पडली. विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. विलास आवारी यांच्या उपस्थितीत एकूण २८ विविध कलाप्रकारांमध्ये ही निवड चाचणी घेण्यात आली.

या निवड चाचणीत अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रंगमंचीय कला, नाट्यकला, नृत्य, संगीत, वाद्यवृंद आणि ललित कला अशा विविध विभागांत विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले.

या विद्यार्थ्यांनी मारली राज्यस्तरीय स्पर्धेत धडक!

रंगमंचीय कला, नाट्यकला आणि नृत्य विभागातून जिग्नेश पाटील, फाल्गुनी राठोड, तुषार करे आणि अनुजा मदने यांची निवड झाली आहे.

संगीत आणि वाद्यवृंद विभागातून सुदर्शन यादव, नरेंद्र जावळे आणि माधव पवार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

तर ललित कला विभागातून ओम पाटे, प्रांजल आहेर, अंकिता मारकड आणि स्वराज कांबळे यांनी निवड चाचणीत यश संपादन केले आहे. हे विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत.

याच निवड चाचणीत ललित कला विभागातून अनुराग काणे आणि वेदांती पानसरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले. तसेच आकांक्षा गवळी, धनश्री डोळे, अमरीन शेख, साक्षी लोणकर, साजिरी देवकाते, श्रेया भांगे, मृण्मयी हिंगणे आणि हुजेफा भोरी या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.

मागील वर्षीही महाविद्यालयाची राज्यस्तरावर चमक!

विशेष म्हणजे, मागील वर्षी जळगाव येथे आयोजित इंद्रधनुष्य युवक महोत्सवात महाविद्यालयाचा विद्यार्थी जिग्नेश राजेंद्र पाटील याने ‘माईम’ या कलाप्रकारात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यावेळीही महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यंदाही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

या निवड चाचणीसाठी प्रमुख मार्गदर्शक आणि टीम मॅनेजर म्हणून प्रा. आर. एम. बेलदार आणि प्रा. पी. जी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, संस्थेचे समन्वयक प्रा. ए. रासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. गोंडे, उपप्राचार्य प्रा. एस. गायकवाड तसेच ए.बी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य ए. डी. भोईटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.

कृषी शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्रातही बारामतीचे विद्यार्थी राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Back to top button