स्थानिक

धावत्या एसटीचा दरवाजा उघडाच! बारामती-मोरगाव मार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; प्रशासन गप्प का?

तिकीटाचे पैसे पूर्ण, पण सुरक्षिततेची हमी कुठे?

धावत्या एसटीचा दरवाजा उघडाच! बारामती-मोरगाव मार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; प्रशासन गप्प का?

तिकीटाचे पैसे पूर्ण, पण सुरक्षिततेची हमी कुठे?

बारामती वार्तापत्र 

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार बारामती-मोरगाव मार्गावर समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एमएच १४ एनई ३५७४ क्रमांकाची एसटी बस चक्क साईडचा पॅनेल दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडा ठेवून धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

धावत्या बसचा दरवाजा उघडा असणे ही काही किरकोळ बाब नाही. बस वेगात असताना दरवाजातून एखादा प्रवासी खाली पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. विशेषतः गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत बस रस्त्यावर धावत असताना दरवाजा उघडा कसा राहिला? बस सुरू करण्यापूर्वी सुरक्षेची तपासणी झाली होती का? चालकाचे याकडे लक्ष गेले नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकीकडे एसटी महामंडळाकडून सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी दिली जाते, तर दुसरीकडे धावत्या बसमधील असा प्रकार प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करणारा आहे. प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेतले जातात, मग त्यांच्या जीवाची जबाबदारी घेण्यास प्रशासन तयार आहे का? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का?

या प्रकरणाची एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. संबंधित बसची तांत्रिक तपासणी करून दरवाजा उघडा राहण्याचे नेमके कारण शोधावे. तसेच चालकाच्या भूमिकेची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटीचा प्रवास सुरू राहणार का? अपघात घडण्यापूर्वी प्रशासनाला जाग येणार की दुर्घटनेनंतरच जबाबदारी निश्चित केली जाणार? बारामती-मोरगाव मार्गावरील या धक्कादायक प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button