ना पोलिसांची भीती, ना पकडले जाण्याची धास्ती! भरदुपारी दुचाकी चोरली; पाहा CCTV VIDEO!
गर्दीच्या ठिकाणीही चोरट्यांचा धुमाकूळ!

ना पोलिसांची भीती, ना पकडले जाण्याची धास्ती! भरदुपारी दुचाकी चोरली; पाहा CCTV VIDEO!
गर्दीच्या ठिकाणीही चोरट्यांचा धुमाकूळ!
इंदापूर : प्रतिनिधि
कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेली दुचाकी काही क्षणांसाठी उभी केली आणि परत आल्यानंतर तीच जागा रिकामी दिसली, तर वाहनमालकाची काय अवस्था होत असेल? असाच धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे समोर आला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरून भरदुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीची चोरी झाली आहे.
विशेष म्हणजे, चोरट्याने अगदी बिनधास्तपणे दुचाकीवर डल्ला मारला. आजूबाजूला लोकांची वर्दळ असण्याची शक्यता असतानाही त्याने कोणतीही घाईगडबड न करता दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, चोरट्याची ही बिनधास्तगिरी पाहून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
आपण आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी केली आहे, असे अनेकांना वाटते; मात्र चोरट्यांची नजर कधी आणि कुठे पडेल, याचा नेम नाही. त्यामुळे वाहनधारकांनीही आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. दुचाकी उभी करताना हँडल लॉक करणे, शक्य असल्यास अतिरिक्त सुरक्षा लॉक वापरणे, गर्दीच्या व सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणीच वाहन पार्क करणे आणि वाहनाची चावी गाडीतच न ठेवणे अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित चोरट्याचा शोध घ्यावा, चोरीला गेलेली दुचाकी शोधून वाहनमालकाला परत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी.
दिवसा तीन वाजता कारखान्यासमोरून दुचाकी चोरीला जात असेल, तर वाहनधारकांनी सावध होण्याची वेळ आली आहे. आज दुसऱ्याची दुचाकी गेली, उद्या आपल्यासोबत असा प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. आता या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश कधी मिळणार, याकडे भवानीनगरकरांचे लक्ष लागले आहे.






