स्थानिक

अजितदादांच्या CCTV फुटेजवरून नवा पेच! DGCA आणि मुंबई पोलिसांचा माहिती देण्यास नकार; बारामतीतील ॲड. नितीन यादव यांचा गंभीर दावा!

CCTV फुटेज अस्तित्वात, पोलिसांना दिल्याची कबुली; मग जनतेपासून का लपवता?

अजितदादांच्या CCTV फुटेजवरून नवा पेच! DGCA आणि मुंबई पोलिसांचा माहिती देण्यास नकार; बारामतीतील ॲड. नितीन यादव यांचा गंभीर दावा!

CCTV फुटेज अस्तित्वात, पोलिसांना दिल्याची कबुली; मग जनतेपासून का लपवता?

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या अखेरच्या प्रवासाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता CCTV फुटेजचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील शासकीय देवगिरी बंगला ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरील तसेच विमानतळ परिसरातील CCTV फुटेज मिळावे, यासाठी माहिती अधिकारातून केलेल्या मागण्यांना संबंधित यंत्रणांनी नकार दिल्याचा दावा बारामतीतील ॲड. नितीन यादव यांनी केला आहे.

ॲड. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज मिळावे, यासाठी त्यांनी नागरी विमान वाहतूक विभागाकडे मागणी केली होती. मात्र, संबंधित विभागाने ही मागणी नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगला निवासस्थानापासून मुंबई विमानतळापर्यंतचे CCTV फुटेज मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई पोलिसांकडेही माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. मात्र, संबंधित माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित नसल्याचे तसेच त्यातून व्यक्तीच्या खासगीपणात हस्तक्षेप होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

CCTV फुटेज अस्तित्वात, मग सार्वजनिक का नाही?

नागरी विमान सुरक्षा ब्युरोकडे प्रथम अपील केल्यानंतरही संबंधित CCTV फुटेज सर्वसामान्य नागरिकांना देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. हे फुटेज पोलिसांना दिले असल्याचेही कळविण्यात आल्याचा दावा ॲड. यादव यांनी केला आहे.

याच मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. फुटेज अस्तित्वात असून ते तपास यंत्रणांना दिले असल्याचे सांगितले जात असेल, तर जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी त्याबाबत पारदर्शक माहिती का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडे फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या घटनात्मक पदावर कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताशी संबंधित उपलब्ध CCTV फुटेजबाबत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पारदर्शकता ठेवावी, अशी भूमिका ॲड. यादव यांनी मांडली आहे.

अजित पवार यांच्या अपघाताबाबत जनतेच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उपलब्ध फुटेजबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि कायदेशीर मर्यादांचा विचार करून ते सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, CCTV फुटेज देण्यास नकार देण्यात आल्याचा मुद्दा आणि त्यासंदर्भातील ॲड. नितीन यादव यांचे दावे यामुळे अजित पवार अपघात प्रकरणातील पारदर्शकतेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित यंत्रणांची अधिकृत बाजू आणि तपासाबाबतची माहितीही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे.

Back to top button