बारामतीत नेमकं चाललंय तरी काय? मुलगा हवा म्हणून इच्छेविरुद्ध गर्भपाताचा आरोप; महिलेचा धक्कादायक खुलासा!
बारामतीतील रुग्णालयात नेले; इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप!

बारामतीत नेमकं चाललंय तरी काय? मुलगा हवा म्हणून इच्छेविरुद्ध गर्भपाताचा आरोप; महिलेचा धक्कादायक खुलासा!
बारामतीतील रुग्णालयात नेले; इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप!
बारामती वार्तापत्र
मुलगा हवा या मानसिकतेतून महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या इच्छेचा गळा घोटला जात असल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत समोर आला आहे. पहिली मुलगी असल्याने दुसऱ्या गर्भधारणेत मुलगाच झाला पाहिजे, असा आग्रह धरत विवाहितेवर गर्भलिंगनिदान आणि गर्भपातासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर महिलेच्या इच्छेविरुद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणल्याची धक्कादायक तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.
या प्रकरणी पीडित मुस्कान वसीम मुलाणी (वय २७, सध्या रा. भांडुप पश्चिम, मुंबई, मूळ रा. जळोची, बारामती) यांच्या फिर्यादीवरून पती वसीम मुबारक मुलाणी, सासू रुक्साना मुबारक मुलाणी, दीर फारूख मुबारक मुलाणी आणि जाऊ सुहाना फारूख मुलाणी अशा चौघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगाच हवा, अन्यथा गर्भपात करा; विवाहितेवर दबाव?
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पहिली मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या गर्भधारणेत मुलगाच झाला पाहिजे, असा आग्रह सासरच्या मंडळींकडून धरला जात होता. त्यासाठी गर्भातील बाळाचे लिंग जाणून घेण्याचा आणि गर्भ मुलीचा असल्यास गर्भपात करण्याचा दबाव पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून आणण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या प्रकाराला विरोध केल्यानंतर फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
बारामतीतील रुग्णालयात नेले; इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप!
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर आरोप १८ ऑक्टोबर २०२५ च्या रात्रीचा आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास पती आणि दीर यांनी तिला बारामती बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या डॉ. सतीश व्ही. देवकाते यांच्या रुग्णालयात नेले.
तेथे गर्भपातासाठी दाखल करण्यात आले आणि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत सासू, दीर, जाऊ आणि पती यांनी संगनमताने आपल्या इच्छेविरुद्ध साडेतीन महिन्यांचा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप महिलेने केला आहे.
गर्भपात अपघातामुळे झाल्याचे सांगून माहेरच्या मंडळींची दिशाभूल करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चार जणांविरुद्ध BNS अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८९, ८५, ८६, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* फिर्यादी: मुस्कान वसीम मुलाणी, वय २७ वर्षे.
* आरोपी: पती वसीम मुबारक मुलाणी, सासू रुक्साना मुबारक मुलाणी, दीर फारूख मुबारक मुलाणी आणि जाऊ सुहाना फारूख मुलाणी.
* गुन्हा दाखल: २३ नोव्हेंबर २०२६, रात्री ११.४० वाजता.
* तपास अधिकारी: महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप.
डॉक्टरांच्या भूमिकेची चौकशी होणार का? अनेक प्रश्न अनुत्तरित!
या प्रकरणात चार नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी कथित गर्भपात ज्या रुग्णालयात झाल्याचा आरोप आहे, त्या रुग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया आणि संबंधित डॉक्टरांची भूमिका याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गर्भपात कोणत्या वैद्यकीय कारणास्तव करण्यात आला?
* महिलेची संमती होती का?
* गर्भपातासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय निकष पाळण्यात आले होते का?
* गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?
* संबंधित रुग्णालयाच्या नोंदी आणि वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी होणार का?
या सर्व बाबींची सक्षम यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या उपलब्ध तक्रारीवरून डॉक्टर किंवा रुग्णालय दोषी असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यांची जबाबदारी आणि संभाव्य कायदेशीर कारवाई तपासातूनच स्पष्ट होईल.
मुलगा-मुलगी भेदभावाचा संतापजनक चेहरा पुन्हा उघड!
एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या आणि स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे मुलगा हवा या मानसिकतेतून महिलांवर अत्याचार होत असल्याचे आरोप समोर येणे ही गंभीर बाब आहे.
गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी, यापेक्षा त्या बाळाचा आणि आईचा जीव महत्त्वाचा नाही का? महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीरावर निर्णय लादण्याचा अधिकार कुणाला आहे?
आता या प्रकरणात पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने जातो, संबंधित रुग्णालयाच्या भूमिकेची चौकशी होते का आणि पीडित महिलेला न्याय मिळतो का, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.






