पोलिसांचे वेशांतर अन् फरार आरोपीचा गेम ओव्हर! जबरी चोरी व खुनाच्या प्रयत्नातील दोघांना बेड्या; वडगाव निंबाळकर पोलिसांचा डबल धमाका!
जबरी चोरीपासून खुनाच्या प्रयत्नापर्यंत!

पोलिसांचे वेशांतर अन् फरार आरोपीचा गेम ओव्हर! जबरी चोरी व खुनाच्या प्रयत्नातील दोघांना बेड्या; वडगाव निंबाळकर पोलिसांचा डबल धमाका!
जबरी चोरीपासून खुनाच्या प्रयत्नापर्यंत!
बारामती वार्तापत्र
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत फरार राहणाऱ्या आरोपींचे आता काही खरे नाही! बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी विशेष रणनीती आखत दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी चक्क वेशांतर करून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले, तर दुसऱ्या आरोपीला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या या दुहेरी कारवाईमुळे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या नियोजनाची आणि तपासातील तत्परतेची चर्चा सुरू झाली आहे.
पहिली कारवाई : वेशांतर करून जबरी चोरीतील फरार आरोपीला पकडले!
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 154/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पवन सॅंडल काळे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
पोलिसांना गुंगारा देत असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विशेष रणनीती आखली. पोलिसांनी वेशभूषा बदलून त्याचा माग काढला आणि अखेर अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांच्या या वेशांतराच्या कारवाईची विशेष चर्चा होत आहे.
दुसरी कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीच्याही मुसक्या आवळल्या!
दुसऱ्या कारवाईत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 77/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(2) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र तात्याबा खामगळ (रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि या आरोपीलाही कायद्याच्या कचाट्यात आणण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी!
ही संपूर्ण कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर, अनिल खेडकर, संदीप गायकवाड, पोलीस शिपाई विकास येटाळे, सचिन घाडगे, आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, नागनाथ परगे तसेच चालक होमगार्ड संदीप कसबे यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश!
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना अटक केल्याने वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कारवाईची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेले वेशांतर हे या कारवाईचे लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले आहे.
फरार आरोपींना शोधून काढत कायद्याच्या कचाट्यात आणण्याच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट संदेश मिळाला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांची ही धडक कारवाई परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.






