दिवाळीत वाहनांची खरेदी अन् आकर्षक नंबरची लॉटरी! बारामती आरटीओची कोटींची कमाई!
१,२६९ वाहनधारकांनी निवडले पसंतीचे नंबर; आरटीओला १.९६ कोटी!

दिवाळीत वाहनांची खरेदी अन् आकर्षक नंबरची लॉटरी! बारामती आरटीओची कोटींची कमाई!
१,२६९ वाहनधारकांनी निवडले पसंतीचे नंबर; आरटीओला १.९६ कोटी!
बारामती वार्तापत्र
आपल्या नव्या वाहनाला आकर्षक, हटके आणि लक्षवेधी क्रमांक मिळावा, अशी अनेक वाहनधारकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी काही वाहनधारक पसंतीच्या क्रमांकासाठी हजारोच नव्हे, तर लाखो रुपये खर्च करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. वाहनांच्या आकर्षक क्रमांकांची हीच क्रेझ बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मोठ्या महसुलाचे साधन ठरली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या दुचाकींच्या एमएच ४२ बीझेड आणि चारचाकी खासगी वाहनांच्या एमएच ४२ सीए या नवीन मालिकांना वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पसंती क्रमांकांच्या आरक्षणातून बारामती आरटीओला तब्बल १ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचा उत्साह वाढलेला असतानाच बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी नव्या नोंदणी मालिका सुरू करण्यात आल्या होत्या. या मालिकांमधील आकर्षक आणि पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद नोंदवला. विशेष म्हणजे, नियमित शुल्काबरोबरच काही क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रियेतूनही मोठा महसूल प्राप्त झाला आहे.
दुचाकींच्या एमएच ४२ बीझेड मालिकेतून ७५ लाखांचा महसूल!
दुचाकी वाहनांच्या एमएच ४२ बीझेड या नवीन मालिकेला वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेतील तब्बल ८२८ पसंती क्रमांक वाहनधारकांनी आरक्षित केले. नियमित शुल्क आणि लिलावाच्या माध्यमातून या क्रमांकांमधून परिवहन कार्यालयाला एकूण ७५ लाख २९ हजार रुपयांचा महसूल मिळाला. दुचाकी वाहनांसाठीही आकर्षक क्रमांक मिळवण्याची स्पर्धा वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
चारचाकींच्या एमएच ४२ सीए मालिकेने कमाईचा आकडा गाठला कोटीपार!
दुसरीकडे, चारचाकी खासगी वाहनांच्या एमएच ४२ सीए या नवीन मालिकेलाही वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील तब्बल ४४१ पसंती क्रमांक आरक्षित करण्यात आले. नियमित शुल्क आणि लिलाव प्रक्रियेतून या मालिकेच्या माध्यमातून १ कोटी २१ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. विशेष म्हणजे, चारचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकांतून मिळालेल्या महसुलाचा आकडा एकट्यानेच कोटीच्या पुढे गेला आहे.
१,२६९ पसंती क्रमांक; जवळपास दोन कोटींचा महसूल!
दुचाकी आणि चारचाकी या दोन्ही मालिकांचा एकत्रित विचार करता, एकूण १,२६९ आकर्षक पसंती क्रमांक वाहनधारकांनी आरक्षित केले आहेत. दुचाकी मालिकेतून ७५ लाख २९ हजार रुपये, तर चारचाकी मालिकेतून १ कोटी २१ लाख ६१ हजार रुपये असा एकूण १ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे आकर्षक वाहन क्रमांकांची वाढती मागणी आणि त्यासाठी वाहनधारकांकडून दिले जाणारे शुल्क यामुळे बारामती आरटीओच्या महसुलात मोठी भर पडली आहे.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद, वाहन नोंदणी प्रक्रियेतील सुलभीकरण, पारदर्शक कार्यपद्धती आणि विभागाकडून करण्यात येणारी कार्यक्षम अंमलबजावणी यामुळे हे यश मिळाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले.
एकूणच, वाहन खरेदीसोबतच आपल्या वाहनाला खास ओळख देणारा आकर्षक क्रमांक मिळवण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. काहींसाठी हा क्रमांक प्रतिष्ठेचा, तर काहींसाठी आवडीचा आणि वैयक्तिक पसंतीचा विषय बनला आहे. याच पसंतीचा फायदा शासनाच्या महसुलात होत असून, बारामती आरटीओने अवघ्या दोन वाहन मालिकांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्यामुळे बारामतीच्या वाहनधारकांमध्ये आकर्षक नंबरची क्रेझ किती वाढली आहे, याची प्रचिती या आकडेवारीतून येत आहे.






