अखेर बारामती नगरपरिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा २० मे रोजी
नगरपरिषदेने सर्व सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

अखेर बारामती नगरपरिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा २० मे रोजी
नगरपरिषदेने सर्व सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा अखेर येत्या २० मे रोजी होणार असून, नगरसेवकांना याबाबत अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ही सभा होऊ शकली नव्हती.त्यामुळे नगरपरिषदेचे अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले होते.
आता हीच सर्वसाधारण सभा पुन्हा बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये यापूर्वीच्या जोडपत्र “अ” मधील सर्व विषयांवर चर्चा करून कामकाज चालविण्यात येणार असल्याचे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या विविध विकासकामांपासून आर्थिक मंजुरी, शहरातील पायाभूत सुविधा, प्रशासनिक निर्णय तसेच नागरिकांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय या सभेत चर्चेस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे नगरसेवकांसह बारामतीकरांचेही लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीनंतर नगरपरिषदेची ही पहिलीच महत्त्वाची सर्वसाधारण सभा ठरणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील रखडलेली कामे, निधी वाटप, विकास आराखडे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सभेत प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
दरम्यान, नगरपरिषदेने सर्व सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, सभेतील कामकाज सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.






