आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दि. माळेगाव साखर कारखाना आणि ऊस वाहतूकदारांमध्ये करार प्रक्रिया सुरू
ऊस वाहतूक करणाऱ्या १ हजार २०० बैलगाडी, ७०० ट्रॅक्टर गाडी, २० हार्वेस्टर, इतर ३५० वाहने आदींमध्ये करार करण्यात आले.

आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दि. माळेगाव साखर कारखाना आणि ऊस वाहतूकदारांमध्ये करार प्रक्रिया सुरू
ऊस वाहतूक करणाऱ्या १ हजार २०० बैलगाडी, ७०० ट्रॅक्टर गाडी, २० हार्वेस्टर, इतर ३५० वाहने आदींमध्ये करार करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
आगामी गाळप हंगाम २०२६-२७ ची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री व माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासन आणि ऊस वाहतूकदार संघटना यांच्यातील ऊसवाहतुकीचा करार अत्यंत सलोख्याच्या वातावरणात गुरुवारी (दि.२८) झाला.
यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक अविनाश देवकाते, शिवराज जाधवराव, नितीनकुमार शेंडे, विजय तावरे, राजेंद्र बुरुंगले, जयपाल देवकाते, रतनकुमार भोसले, देविदास गावडे, अनिल जगताप, कार्यकारी संचालक अशोक पाटील, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे, संघटनेचे पदाधिकारी आदींसह बहुसंख्येने ऊस वाहतूकदार उपस्थित होते.
यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या १ हजार २०० बैलगाडी, ७०० ट्रॅक्टर गाडी, २० हार्वेस्टर, इतर ३५० वाहने आदींमध्ये करार करण्यात आले. वाहतूकदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका राहिल्याने दोन्ही बाजूंना परवडणारे आणि न्याव्य दर निश्चित करण्यात आले आहेत. करार वेळेत झाल्यामुळे ऊसतोडणी आणि वाहतुकीचे नियोजन कोलमडणार नाही.
पर्यायाने शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला पोहचेल. कारखान्याच्या वतीने आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. आगामी २०२६-२७चा हंगाम यशस्वी करण्यासाठी वाहतूकदारांचे सहकार्य मोलाचे ठरेल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
संचालक शिवराज जाधवराव म्हणाले कि, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये माळेगाव कारखाना ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या सहकायनि समज-गैरसमज न करता कारखान्याच्या नावलौकिकास साजेल असे काम करूयात.






