क्रीडा

कबड्डी, खो-खोने गाजले आगरवाल विद्यालयाचे मैदान; राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

‘खेळा, निरोगी राहा!’

कबड्डी, खो-खोने गाजले आगरवाल विद्यालयाचे मैदान; राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

‘खेळा, निरोगी राहा!’

बारामती वार्तापत्र 

रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम आर. एन. अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात व क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे महान खेळाडू व ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. सतीश पाचपुते, पर्यवेक्षिका सौ. अलका चौधरी तसेच सर्व शिक्षकांनी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केले.

दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व, मेजर ध्यानचंद यांचे जीवनकार्य आणि भारतीय हॉकीला त्यांनी मिळवून दिलेले गौरवशाली स्थान याविषयी उपशिक्षक श्री. विकास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकी संघाने मिळविलेल्या ऐतिहासिक ऑलिम्पिक सुवर्णपदकांची कामगिरी, त्यांचे अद्भुत खेळकौशल्य आणि देशासाठीचे योगदान यांचा त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेजर ध्यानचंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यालयात कबड्डी, खो-खो तसेच विविध पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत मैदानावर आपली क्रीडाकौशल्ये दाखवली. विद्यार्थ्यांचा उत्साह, संघभावना, खिलाडूवृत्ती आणि विजयासाठीची जिद्द यामुळे विद्यालय परिसर क्रीडामय झाला.

खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयीची आवड निर्माण झाली. “खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या” हा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Back to top button