स्थानिक

कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव;अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान

२६ वर्षांच्या प्रदीर्घ

कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव;अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान

२६ वर्षांच्या प्रदीर्घ

बारामती वार्तापत्र 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद संपतराव जगताप यांच्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ, पारदर्शक आणि विकासाभिमुख सेवेला मानाचा मुजरा करत बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती गौरव सोहळा मंगळवारी (३० जून) मुख्य बाजार आवारातील नवीन रेशीम मार्केट इमारतीत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत मोरे यांनी अरविंद जगताप यांच्या २६ वर्षांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या प्रामाणिक, तत्पर आणि शिस्तबद्ध प्रशासनशैलीचे कौतुक केले.

राज्यातील सचिव कॅडर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका, उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार तसेच उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला.

यावेळी शरद भोसले यांनी सादर केलेल्या लघुचित्रफितीत अरविंद जगताप यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. उपबाजार आवारासाठी जागा उपलब्ध करून देणे, पेट्रोल व सीएनजी पंप उभारणी, बारामती, जळोची, सुपे आणि झारगडवाडी येथे जागा संपादन, आधुनिक रेशीम कोष मार्केट, ई-नाम प्रणाली, ग्रेडिंग मशिन, मॅग्नेट प्रकल्प, जळोची येथील नवीन कार्यालयीन इमारत, रयत भवनातील शेतकरी मॉल तसेच व्यापारी व व्यावसायिक गाळ्यांची उभारणी अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

वक्त्यांनी सांगितले की, दिवंगत अजित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद जगताप यांनी बाजार समितीला विकासाची नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यासह देशातील आदर्श बाजार समिती म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

अध्यक्षीय समारोपात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी अरविंद जगताप यांच्या कार्याचे कौतुक करत मंत्रालय स्तरावर विविध विकासकामांसाठी निधी मिळवून देण्यात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले.

मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले असून, बाजार समितीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अरविंद जगताप यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपसभापती अरुण सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
——
‘विकासाचा चेहरा बदलणारे सचिव’
अरविंद जगताप यांच्या कार्यकाळात बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ पायाभूत सुविधा वाढवल्या नाहीत, तर ई-नाम, आधुनिक रेशीम बाजार, शेतकरी मॉल, सीएनजी पंप, व्यापारी संकुल यांसारख्या प्रकल्पांमुळे बाजार समितीच्या कामकाजात आधुनिकतेची भर पडली.

त्यामुळे बारामती बाजार समितीची ओळख राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श बाजार समिती म्हणून निर्माण झाली, अशी भावना कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.

Back to top button