स्थानिक

बारामती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे, तालुकाध्यक्षपदी वैभव बुरुंगले

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार

बारामती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे, तालुकाध्यक्षपदी वैभव बुरुंगले

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. बारामती शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वीरधवल गाडे, तर बारामती तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वैभव बुरुंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी बारामती दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक आढावा घेतला होता. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

नियुक्तीनंतर बोलताना वीरधवल गाडे आणि वैभव बुरुंगले यांनी बारामतीत काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावोगावी संपर्क अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करत भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि जनतेशी संबंधित विविध मुद्द्यांवर जनजागृती मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. आगामी काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विचारांना बळ देत बारामती तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याची ग्वाही दिली. तसेच आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज (बंटी) पाटील, जिल्हाध्यक्ष लहू निवंगुने, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, प्रदेश सचिव आकाश मोरे आणि ज्येष्ठ नेते अशोक इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत पक्षविस्तारासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत राज्यभर पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीत नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Back to top button