गोड बोलून विश्वास जिंकला; पितळेचे ‘सोन्याचे बिस्कीट’ देऊन ३ तोळे सोने लुबाडले!
‘हे तुमच्या सोन्यापेक्षा जड आहे’

गोड बोलून विश्वास जिंकला; पितळेचे ‘सोन्याचे बिस्कीट’ देऊन ३ तोळे सोने लुबाडले!
‘हे तुमच्या सोन्यापेक्षा जड आहे’
शिक्रापूर पोलिसांची बीडमध्ये धडक; आरोपी जेरबंद, साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापूर,प्रतिनिधि
आधी गोड बोलून महिलेचा विश्वास संपादन करायचा, त्यानंतर सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवायचे आणि संधी साधून तिच्याजवळील सोन्याचे दागिने लंपास करायचे, असा प्रकार शिक्रापूर परिसरात घडला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत थेट बीड गाठले आणि त्याला जेरबंद केले. आरोपीकडून महिलेचे सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ४.५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल, हस्तगत करण्यात आला आहे.
अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जात होत्या. शिक्रापूर येथील चाकण चौकात वाहनाची वाट पाहत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. गोड बोलत बोलत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले.
यानंतर दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील झाडाखाली नेण्यात आले. तेथे बोलण्याच्या ओघात आरोपीने त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कट करून घेतल्या, तसेच गळ्यातील सोन्याची पानपोतही काढून घेतली.
यानंतर आरोपीने महिलेच्या हातात सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट ठेवले. ‘हे तुमच्या सोन्यापेक्षा जास्त वजनाचे आहे,’ असे सांगून त्याने महिलेचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
आरोपी गेल्यानंतर दरेकर यांनी हातातील बिस्कीट तपासले असता ते सोन्याचे नसून पितळेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीने आरोपीचा माग काढला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली. चाकण चौकापासून आरोपीच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
फुटेजच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून पोलिस पथक थेट बीड जिल्ह्यात पोहोचले. तेथे अभिमान तुपे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची पानपोत, असे महिलेचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासामुळे मुद्देमालही परत
महिलेचा विश्वास संपादन करून तीन तोळे सोने लंपास केल्यानंतर आरोपीने पोलिसांना चकवा देत बीड गाठले होते. मात्र, चाकण चौकापासूनच्या सीसीटीव्ही फुटेजने त्याचा माग काढला आणि शिक्रापूर पोलिसांनी बीडमध्ये धडक देत आरोपीला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, फसवणुकीचा तपास करताना पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही पूर्णपणे हस्तगत केला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे आणि शिवाजी चितारे यांच्या पथकाने सहभाग घेतला.






