दादांचा शब्द हवेत विरला?” विश्वासनगर रस्त्यावरून बारामतीत संताप;सार्वजनिक बांधकाम विभाग-नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा हल्लाबोल
पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था वाढण्याची भीती

दादांचा शब्द हवेत विरला?” विश्वासनगर रस्त्यावरून बारामतीत संताप;सार्वजनिक बांधकाम विभाग-नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा हल्लाबोल
पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था वाढण्याची भीती
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गुणवडी रोड परिसरातील विश्वासनगर येथील रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नाने पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून रस्ता करण्याचे आदेश दिल्यानंतरही काम अर्धवट थांबले असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“दादांनी दिलेला शब्दही आता प्रशासन पायदळी तुडवतंय का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विश्वासनगर परिसरातील रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट होती. खड्डे, चिखल, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि वाहतुकीचा खोळंबा यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते.
विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर संतप्त नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेत रस्ता तातडीने करण्याची मागणी केली होती.
स्थानिकांच्या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरूनच रस्ता करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही. काही निवडणक अधिकाऱ्यांनी प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे पुढे करत काम अचानक थांबविले. त्यानंतर विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने काम आणखी रखडले.
आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी पुन्हा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र यावेळी समोर आलेल्या माहितीनंतर नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे.
रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी निवडणुकीच्या काळात अन्य कामांकडे वळवण्यात आल्याची चर्चा असून आता पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
यामुळे “काम सुरू करून मध्येच थांबवणे आणि निधी दुसरीकडे वळवणे म्हणजे नागरिकांच्या विश्वासाशी खेळ नाही का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
“एकीकडे उपमुख्यमंत्री आदेश देतात आणि दुसरीकडे प्रशासन त्यालाच हरताळ फासते, मग सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?” अशी तीव्र प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
दरम्यान, पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






