देहदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांना सलाम! बारामतीत मंगळवारी कृतज्ञता सोहळा
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही मानवतेची सेवा

देहदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांना सलाम! बारामतीत मंगळवारी कृतज्ञता सोहळा
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही मानवतेची सेवा
बारामती वार्तापत्र
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही समाजहिताचा विचार करून देहदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
या सोहळ्यात देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या मानवतावादी निर्णयाप्रती आदर व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच देहदान व अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी देहदानाचे मोठे योगदान असून, अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी देहदान व अवयवदानाच्या या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी केले आहे.






