पुण्यात बारामतीच्या रीलस्टारवर हल्ला; अथर्व जगताप प्रकरणात सात जण गजाआड
इन्स्टाग्रामवरील लाईक-कमेंटचा वाद विकोपाला

पुण्यात बारामतीच्या रीलस्टारवर हल्ला; अथर्व जगताप प्रकरणात सात जण गजाआड
इन्स्टाग्रामवरील लाईक-कमेंटचा वाद विकोपाला
बारामती वार्तापत्र
पुण्यातील डेक्कन परिसरात १९ वर्षीय रील क्रिएटरवर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात दोन महिलांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना १५ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा तीन ते पावणे चारच्या सुमारास डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सी येथे घडली. या हल्ल्यात अथर्व जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) हा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व जगताप हा सोशल मीडियावर रील्स बनवणारा रीलस्टार आहे. लक्झरी कारसोबत स्टंटचे रील्स बनवण्यासाठी तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याची माहिती आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन अथर्वचा जबाब नोंदवला. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांना अटक
या प्रकरणात माधवी कुंभार (२३), स्नेहल संजय सोनके (२०), राहुल वाघमारे (२०), शिवानंद तलवार (२१), आदित्य भालेराव (२२), प्रियांश भोसले (२२) आणि प्रेम साळवे (२२) यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जण डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह तर काही जण फ्लेक्स प्रिंटिंगचे काम करतात. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कास पठारावरील जुन्या वादातून हल्ला?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अथर्व हा लक्झरी कारसोबत स्टंटचे रील बनवितो. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात कारचा स्टंट करताना त्याच्या वाहनाने दुसऱ्या गटाच्या वाहनाला ओव्हरटेक केल्याने वाद झाला होता. या जुन्या वादातूनच डेक्कनमधील हल्ल्याची घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणातील रील क्रिएटर माधवी कुंभार आणि अथर्व यांच्यात सोशल मीडियावर झालेल्या संभाषणांचीही पोलीस तपासणी करत आहेत.
कॅफेमध्येच हल्ल्याचे नियोजन?
डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या माहितीनुसार, आरोपींनी हल्ल्याचे नियोजन करून कॅफेमध्ये प्रवेश केला. तक्रारीनुसार, आरोपींच्या गटातील काही जणांनी अथर्वला कॅफेमध्ये घेरले आणि त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यातील एक वार त्याच्या मानेवर करण्यात आल्याचा आरोप आहे.
हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम, आरोपींची भूमिका आणि जुन्या वादाचे कारण काय होते, याचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






