निष्ठावंतांना डच्चू, महत्त्वाकांक्षींची चांदी?; बारामतीतील संस्थांमध्ये नेमकं सुरू काय?
विश्वासू कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निर्णय प्रक्रियेवरील प्रश्न आणि २०२९ च्या राजकीय चर्चांनी सहकार व शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

निष्ठावंतांना डच्चू, महत्त्वाकांक्षींची चांदी?; बारामतीतील संस्थांमध्ये नेमकं सुरू काय?
विश्वासू कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निर्णय प्रक्रियेवरील प्रश्न आणि २०२९ च्या राजकीय चर्चांनी सहकार व शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
बारामती वार्तापत्र
बारामतीतील सहकार, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील काही संस्थांमध्ये अलीकडे झालेल्या प्रशासकीय निर्णयांमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अंतर्गत निर्णयप्रक्रिया आणि वाढत्या गटबाजीबाबत राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
चर्चेनुसार, बारामती नावाचा समावेश असलेल्या एका आर्थिक संस्थेत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आणि पवार कुटुंबाशी निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या स्थानिक शाखांमधून इतर जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबातील एका सदस्याचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अशा प्रकरणांत अजितदादा पवार स्वतः लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा देत असत, अशीही चर्चा काही वर्तुळात आहे.
काही कार्यकर्त्यांच्या मते, अनेक वर्षे संस्थांसाठी काम करणाऱ्या विश्वासू आणि निष्ठावंत व्यक्तींना बाजूला सारून काही महत्त्वाकांक्षी गट संस्थांमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घडामोडींचा संबंध आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य राजकीय तयारीशी जोडला जात असल्याच्याही चर्चा सुरू आहेत.
“निष्ठावंत पायाखाली, मर्जीतील मंडळी कडेवर,” अशी भावना काही कार्यकर्त्यांकडून खासगीत व्यक्त केली जात असल्याचे सांगितले जाते. संस्थांच्या निर्णयप्रक्रियेत वाढता हस्तक्षेप, अंतर्गत गटबाजी आणि प्रशासकीय निर्णयांमुळे संस्थांची स्वायत्तता व कार्यक्षमता प्रभावित होण्याची भीतीही काही जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, एका आर्थिक संस्थेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चर्चेच्या संदर्भात एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याचीही चर्चा आहे. या कारवाईबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत असून, “यापूर्वी अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नव्हते; आता निर्णयप्रक्रियेवर नेमका कोणाचा प्रभाव आहे?” असा सवालही काहीजण उपस्थित करत आहेत.
या घडामोडींमुळे बारामतीतील सहकार, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील संस्थांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याची चर्चा असून, संस्थांचे दीर्घकालीन हित, पारदर्शक प्रशासन आणि स्वायत्तता कायम राहणार की राजकीय समीकरणांना अधिक प्राधान्य दिले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(टीप : या वृत्तातील काही बाबी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चांवर आणि दाव्यांवर आधारित आहेत. संबंधित संस्था किंवा संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल.)







