स्थानिक

नीरा डाव्या कालव्याचा प्रवाह बंद; बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा

पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत

नीरा डाव्या कालव्याचा प्रवाह बंद; बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा

पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत

बारामती वार्तापत्र 

नीरा डाव्या कालव्यातील प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहरासह जळोची, रुई, तांदूळवाडी व बारामती ग्रामीण भागातील पाणीपुरवठा नियोजनात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

बारामती नगर परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
नगर परिषदेच्या माहितीनुसार, गुरुवार (दि. १८ जून) पर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून त्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाटस रिंगरोड व जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत अनेक भागांमध्ये शुक्रवार (दि. १९ जून) आणि शनिवार (दि. २० जून) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्याचप्रमाणे सायली हिल व जळोची जलशुद्धीकरण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील काही भागांमध्येही नियोजित दिवशी पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुई, सायली हिल, सूर्यनगरी, देशाई इस्टेट, जळोची गावठाण, तांदूळवाडी गावठाण आदी भागांचा त्यामध्ये समावेश आहे.

मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच नीरा डाव्या कालव्यातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची व्यवस्था कायम राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, उन्हाळ्यानंतरही निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे नागरिकांना काही काळ पाणी वापराबाबत दक्षता बाळगावी लागणार असल्याचे चित्र आहे. बारामती नगर परिषदेकडून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button