माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा कट उधळला; बारामती तालुक्यात खळबळ
स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा कट उधळला; बारामती तालुक्यात खळबळ
स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बारामती वार्तापत्र
पुण्याच्या मनस्तापदायक गुन्हेगारी घटनांमध्ये भर घालणारी एक धक्कादायक घटना बारामती तालुक्यात उघडकीस आली आहे. माजी सरपंचाच्या मुलाचा खून करण्याचा कथित कट माळेगाव पोलिसांनी वेळीच उधळून लावला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेडद गावचे लोकनियुक्त सरपंच गणेश काशीद यांच्याविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून खुनाचा कट रचल्याची बाब समोर आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी पिंपळनेर येथील नितीन बबनराव कुलकर्णी यांचा चालक हनुमंत गणेश गावडे आणि मदतनीस संदेश मोरे यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गणेश काशीद यांच्या सांगण्यावरून मेडदचे माजी सरपंच अर्जुन यादव यांचा मुलगा अभिजित यादव याच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते.
पोलिस तपासानुसार, आरोपी गणेश काशीद यांनी एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून पिस्तूल आणि पाच लाख रुपये देऊन अभिजित यादव याच्या हत्येची योजना आखली होती. मात्र, संबंधित अल्पवयीन मुलाने ही माहिती अभिजित यादव यांच्यापर्यंत पोहोचवल्याने कट फसला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अधिक तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात जमीन व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून हा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून दोन्ही गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे.
या कारवाईत माळेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस कर्मचारी देविदास साळुंखे, राहुल पांडे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर सामग, ओमराज राऊत, उमेश वाघमारे आणि जर्सिंग ककवे यांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.






