पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवेचा हात; नवयुवक फाउंडेशनच्या मोफत उपचार केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
"सेवा हीच खरी विठ्ठल सेवा

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवेचा हात; नवयुवक फाउंडेशनच्या मोफत उपचार केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
“सेवा हीच खरी विठ्ठल सेवा”
इंदापूर, आदित्य बोराटे –
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त नवयुवक फाउंडेशन, पोरापोरांची चावडी, कसबा (इंदापूर) यांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी केंद्राचे आयोजन करण्यात आले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपक्रमांतर्गत शेकडो वारकरी भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक उपचार, आपत्कालीन आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यातील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरली.
यावेळी डॉ. आश्विनी पाटील (BAMS, P.G.D.E.M.S., I.T.L.S.) आणि डॉ. नेहा दडडी (BHMS) यांनी वारकरी भाविकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार दिले. आरोग्यविषयक मार्गदर्शनासह तातडीच्या उपचारांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

नवयुवक फाउंडेशनच्या सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि सेवाभावी वृत्तीने वारकऱ्यांची सेवा केली. औषधांचे वितरण, आरोग्य तपासणीसाठी मदत, वारकऱ्यांचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आपत्कालीन सेवांमध्ये स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत “समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा संदेश कृतीतून अधोरेखित केला.
“सेवा हीच खरी विठ्ठल सेवा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी भाविकांनी कौतुक केले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजासाठी कार्यरत राहणार असल्याचे नवयुवक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. श्रेयश गवळी, रोहित माने, ओंकार जामदार, अक्षय क्षिरसागर, यश जाधव, केदार जामदार, गणेश सूर्यवंशी, राहुल माने, श्रीकांत माने, सिद्धार्थ गायकवाड, प्रीतेश जाधव, श्रेयस थोरात, अथर्व इंगोले, ओम जगताप, शिव गायकवाड, पार्थ कांबळे, कांतीलाल पांगरे आणि पृथ्वी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.






