क्राईम रिपोर्ट

बारामतीतील कसबा परिसरामध्ये चोरांचा वावर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

बारामतीतील कसबा परिसरामध्ये चोरांचा वावर; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

बारामती वार्तापत्र

कसबा परिसरातील श्रीराम नगर भागात पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी एका घराचे गेट उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर परिसरात संशयित चोरटे दबक्या पावलांनी फिरत होते. त्यांनी एका घरासमोरील गेट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र गेट न उघडल्याने काही वेळ परिसरात थांबून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.

दरम्यान, श्रीराम नगर परिसरातून निघाल्यानंतर संबंधित चोरट्यांनी जामदार रोड परिसरात जाऊन चोरी केल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अलीकडच्या काळात शहर व उपनगर भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रात्री अपरात्री संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. वेळेवर कारवाई करून चोरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

Back to top button