स्थानिक

बारामतीतील तरुणाई ‘ड्रग्ज’च्या विळख्यात; अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू? प्रशासनावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपासून ड्रग्जची उपलब्धता वाढल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

बारामतीतील तरुणाई ‘ड्रग्ज’च्या विळख्यात; अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू? प्रशासनावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपासून ड्रग्जची उपलब्धता वाढल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहर व परिसरात वाढत्या प्रमाणात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर एका तरुणाचा कथित ड्रग्ज अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा बारामतीतीलच रहिवासी असून, काही काळापासून तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची चर्चा परिसरात होती. घटनेच्या दिवशी त्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे सेवन केल्याने त्याची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीय व मित्रांनी तातडीने त्याला उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात नेले. मात्र, संबंधित रुग्णालयाने विविध कारणे देत त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्याला दुसऱ्या एका प्रा. लि. रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, परंतु प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, बारामतीत गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जची उपलब्धता वाढल्याची चर्चा सातत्याने होत आहे. शहर व परिसरात नशेच्या पदार्थांचा बाजार तेजीत असून, तरुणांमध्ये त्याचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे. काही संघटित टोळ्या गुप्तपणे या पदार्थांची विक्री करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, बारामती शहर पोलिसांनी अलीकडेच सुमारे अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त केल्याची कारवाई केली होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. गेल्या दीड महिन्यांपासून या जप्तीमागील सूत्रधार कोण, याचा उलगडा झालेला नाही. “तपास सुरू आहे” या एकाच उत्तरावर पोलिस समाधान मानत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधूनमधून होत असल्या तरी त्या अपुऱ्या व दिखाऊ असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे ड्रग्ज माफियांना मोकळे रान मिळत असल्याची भावना वाढीस लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पालक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. “तरुण पिढी वाचवायची असेल, तर ड्रग्जविरोधी मोहीम अधिक तीव्र करणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले जात आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना नशेच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्याचीही गरज अधोरेखित केली जात आहे.

या घटनेनंतर तरी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.
बारामतीसारख्या शहरात वाढत चाललेली ही धोकादायक प्रवृत्ती वेळीच रोखली नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button