भरधाव फॉर्च्यूनरचा धुमाकूळ; ब्लॅक काचांमुळे संशय वाढला,पोलिसांनी केली जप्त!
महिनाभर पोलिसांना चकवा

भरधाव फॉर्च्यूनरचा धुमाकूळ; ब्लॅक काचांमुळे संशय वाढला,पोलिसांनी केली जप्त!
महिनाभर पोलिसांना चकवा
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून एका संशयास्पद फॉर्च्यूनर गाडीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
अखेर काल दिवसभराच्या पाठलाग आणि नाकाबंदीनंतर ही गाडी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची फॉर्च्यूनर गाडी गेल्या महिनाभरापासून बारामती शहर आणि परिसरात वारंवार दिसत होती.
या गाडीच्या चालकाने अनेक वेळा पोलिसांच्या नजरेतून निसटत चकमा दिल्यामुळे पोलिसांना तिचा माग काढणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे, ही गाडी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक विभागालाही अनेकदा चकवा देत असल्याने ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती.
या गाडीची सर्व काच काळ्या (ब्लॅक फिल्म) असल्याने आत काय सुरू आहे, हे बाहेरून दिसत नव्हते. तसेच गाडीचा नंबरही स्पष्टपणे वाचता येत नसल्याने पोलिसांच्या शंकेत आणखी भर पडली. त्यामुळे या वाहनावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
काल (दि.२८\४\२०२६) रोजी बारामतीतील शिवाजी चौक परिसरात या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या वेळीही चालकाने पोलिसांना चकमा देत गाडी पळवली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी लावून या वाहनाचा शोध सुरू केला. शहरातील विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली.
अखेर दिवसभराच्या शोधमोहीमीनंतर संबंधित फॉर्च्यूनर गाडीला अडवण्यात पोलिसांना यश आले. गाडी ताब्यात घेतल्यानंतर तिची सखोल तपासणी करण्यात आली असून, चालक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती बारामती ट्रॅफिक विभागाचे प्रमुख माने यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.
गाडीच्या ब्लॅक काचा काढण्यात येणार का, वाहनधारकावर कोणती कारवाई होणार, तसेच अशा नियमभंग करणाऱ्या इतर वाहनांवरही पोलिस कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर बारामती पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, विशेषतः काळ्या काचा लावलेल्या आणि नंबर प्लेट अस्पष्ट असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे येत्या काळात शहरात विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, महिनाभर पोलिसांना चकवा देणाऱ्या या फॉर्च्यूनर गाडीचा अखेर लागलेला छडा हा पोलिसांसाठी मोठा दिलासा मानला जात असून, नियम मोडणाऱ्यांसाठीही हा इशारा ठरत आहे.






