स्थानिक

बारामती एसटी महामंडळात ज्येष्ठांची परवड; सवलत कार्ड नोंदणीसाठी तासनतास रांगा, अपुऱ्या सुविधांमुळे संताप

केवळ १ ते २ अधिकारीच नियुक्त

बारामती एसटी महामंडळात ज्येष्ठांची परवड; सवलत कार्ड नोंदणीसाठी तासनतास रांगा, अपुऱ्या सुविधांमुळे संताप

केवळ १ ते २ अधिकारीच नियुक्त

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या सवलत कार्ड नोंदणी प्रक्रियेदरम्यान गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक सकाळी लवकरपासून कार्यालयात हजेरी लावत असले, तरी अपुरे मनुष्यबळ आणि नियोजनाच्या अभावामुळे त्यांना अक्षरशः तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागत आहे.

गर्दीचा कोंडमारा, श्वास घेणंही कठीण

नोंदणीची प्रक्रिया केवळ एका लहान खोलीत सुरू असल्याने त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहतात. मात्र, खोलीतील अपुरी जागा आणि हवेशीर व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. काही जणांना बसण्यासाठीही जागा नसल्याने उभ्यानेच वेळ काढावा लागत आहे.

संथ गतीमुळे नागरिक त्रस्त

कार्यालयात केवळ एकाच खिडकीवर नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने कामाचा वेग अत्यंत मंद आहे. सकाळी आलेले नागरिक दुपार उलटून गेल्यावरही त्याच ठिकाणी अडकून पडतात. “७ वाजता आलो, पण दुपारी ३ वाजेपर्यंत नंबरच लागला नाही,” अशी तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

अपुरं मनुष्यबळ – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असताना देखील नोंदणीसाठी केवळ १ ते २ अधिकारीच नियुक्त करण्यात आले आहेत. ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेकडे बोट दाखवणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असताना पुरेसं मनुष्यबळ का देण्यात आलं नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

तत्काळ उपाययोजनांची गरज

या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. नोंदणीसाठी स्वतंत्र काउंटर वाढवणे, ज्येष्ठांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच टोकन प्रणाली लागू करणे यांसारख्या उपायांची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button