स्थानिक

बारामतीत ट्रान्सफॉर्मरजवळ सिगारेटमुळे आग!; वेळेत नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली

बारामतीत ट्रान्सफॉर्मरजवळ सिगारेटमुळे आग!; वेळेत नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील गुणवडी रोड परिसरात एका इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरजवळ निष्काळजीपणे टाकलेल्या सिगारेटमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मरजवळ असलेल्या गवत/कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीने पेटती सिगारेट फेकली.

त्यातून अचानक आग भडकली आणि ती ट्रान्सफॉर्मरजवळील वायरिंगपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला.

दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागरिक टीव्हीवर निकाल पाहत असताना अचानक लाईट गेल्याने संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, ट्रान्सफॉर्मरजवळ आग लागल्यामुळे पुरवठा बंद केल्याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक वायरमन अभिजीत गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बारामती नगर परिषदेच्या अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाने तत्काळ आग आटोक्यात आणत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळेत उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही काळानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि नागरिकांचा दिलासा झाला.

या घटनेनंतर नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी सिगारेट किंवा ज्वलनशील वस्तू निष्काळजीपणे न टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Back to top button