राजकीय

बारामतीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; कमी मतदानाच्या मुद्द्यावरून बैठक तापली;दोन नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी

शहरातील घटलेल्या मतदानाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे.

बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी; कमी मतदानाच्या मुद्द्यावरून बैठक तापली

शहरातील घटलेल्या मतदानाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक पार पडल्यानंतर मतदानाची टक्केवारी कमी का झाली, याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही शहर पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. या वादात खासदार पार्थ पवार यांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले जात असले, तरी पक्षाकडून अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दिनांक २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर कमी मतदानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना दोन नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये एका माजी नगरसेवकानेही विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत वाद घातल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. संबंधित नगरसेवकांपैकी एक जण कायम वादग्रस्त ठरत असल्याची चर्चा असून, यापूर्वीही नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी त्यांच्या वर्तनामुळे शहरात खळबळ उडाली होती.

  • बैठकीदरम्यान मतदान घटण्यामागील कारणांवर चर्चा सुरू असताना दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आणि वातावरण तणावपूर्ण झाले. हा वाद नेमका कोणत्या मुद्द्यावरून पेटला, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी मतदानाच्या टक्केवारीवरूनच वाद सुरू झाल्याचे समजते.
    दरम्यान, शहरातील घटलेल्या मतदानाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र आहे. उलट प्रत्येक जण पक्ष नेतृत्वाशी आपली जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अलीकडेच शहर राष्ट्रवादीत झालेल्या खांदेपालटानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते.

या बैठकीत पार्थ पवार यांनी आगामी काळात बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यावर आणि कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले जाते. मात्र, बैठकीत झालेल्या वादामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच, काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये अश्लील वक्तव्यांमुळे वाद अधिक चिघळल्याचेही बोलले जात आहे. काही जण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्याचीही चर्चा आहे. अखेरीस खासदार पार्थ पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला असला, तरी बारामतीतील राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Back to top button