स्थानिक

बारामती नगरपरिषदेत नेमकं चाललंय तरी काय?चार महिने उलटले तरी सर्वसाधारण सभा नाही!

नगरसेवकांमध्ये नाराजी, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

बारामती नगरपरिषदेत नेमकं चाललंय तरी काय?चार महिने उलटले तरी सर्वसाधारण सभा नाही!

नगरसेवकांमध्ये नाराजी, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेची निवडणूक पार पडून नवीन सत्ता स्थापन होऊन तब्बल चार महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नसल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न अधिकृतपणे मांडण्यासाठी सभागृहच उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

नगरपरिषदेच्या कारभारात सर्वसाधारण सभेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. या सभेमध्ये नगरसेवक आपल्या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था, आरोग्य सुविधा, विकासकामे तसेच प्रशासनातील अनियमितता यांसारखे मुद्दे मांडत असतात. मात्र बारामती नगरपरिषदेत अद्याप सभा न झाल्याने अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत.

दरम्यान, नगरपरिषदेतील काही नगरसेवकांमध्ये याबाबत कुजबुज सुरू असून दोन गटांतील राजकारण चांगलेच तापल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. आगामी सर्वसाधारण सभेमध्ये अनेक मुद्द्यांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही बेकायदेशीर किंवा वादग्रस्त कामांवरही आवाज उठवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सभा लांबणीवर टाकली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नागरिकांच्या दैनंदिन समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक प्रभागांमध्ये पाणीटंचाई, खराब रस्ते, साफसफाईचा अभाव, स्ट्रीट लाईट बंद असणे यांसारख्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र या समस्या अधिकृत बैठकीत मांडल्या जात नसल्याने त्यावर निर्णय होत नसल्याची खंत नगरसेवक व्यक्त करत आहेत.

नगरसेवक आणि नगरसेविका यांना सभागृहात आपला आवाज उठवण्याची संधी कधी मिळणार आणि बारामतीकरांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे कधी पोहोचणार, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नेमकी कधी होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Back to top button