बारामती पोलिसांची दमदार कामगिरी मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; १७ मोटारसायकली जप्त, १४ गुन्हे उघड
पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; १७ मोटारसायकली जप्त, १४ गुन्हे उघड
पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली
बारामती वार्तापत्र
मौजमजा करण्यासाठी सराईत पद्धतीने विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरून नेणाऱ्या तरुणांच्या टोळीचा खेड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण (डीबी) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच १४ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी बुधवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण उपस्थित होते.
या कारवाईमुळे खेड, शिक्रापूर (ता. शिरूर), पारगाव, मंचर, महाळुंगे उत्तर (ता. आंबेगाव) आणि वडूज (ता. जुन्नर) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले की, ८ जून २०२४ रोजी निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान उभी असलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १२ टीई ९४६८) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान बारामती वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले आणि आकाश कांबळे यांनी संशयास्पद दुचाकीची ई-चलन प्रणालीद्वारे पडताळणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी तातडीने याची माहिती खेड पोलिसांना दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून रोहित आप्पासाहेब कानगुडे (वय २२, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) आणि चंद्रशेखर अनिल पवार (वय २२, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दोघांना अटक केली.
पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १७ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, महेश गरड, पोलीस हवालदार बापूसाहेब बिडकर, महेश गोसावी, सूरज राक्षे, गोकुळ कोळी, संकेत कवडे तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.







