स्थानिक

बारामती ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअर मार्गदर्शनाचा लाभ

प्रगतीबरोबरच सामाजिक जाणीवा जपण्याचा संदेश

बारामती ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअर मार्गदर्शनाचा लाभ

प्रगतीबरोबरच सामाजिक जाणीवा जपण्याचा संदेश

बारामती वार्तापत्र 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बारामती शाखेच्या वतीने दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शनिवारी (२१ जून) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना त्यांना भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक जाणीवा जपण्याचा संदेश दिला. यावेळी श्री. उदय रानडे आणि श्री. अश्विनीकुमार पत्की यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धात्मक युगातील आव्हाने आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अनुप्रिता डांगे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरस्कार, सन्मानचिन्हे आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुकाध्यक्ष जगदीश देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महिला अध्यक्षा सौ. मेधा पळशीकर यांनी प्रास्ताविक करताना युवक-युवतींनी संघटनेशी जोडले जाऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच संघटन विस्तारासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

यावेळी महासंघाच्या विविध नवीन पदांवर नियुक्त्यांची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अष्टपुत्रे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोरकुमार जोशी, सौ. सारिका इंगळे, सौ. विद्या भोयरेकर, सौ. अश्विनी जोशी, श्री. केदार सुभेदार, सौ. पल्लवी अभ्यंकर, सौ. योगिता कुलकर्णी यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button