क्राईम रिपोर्ट

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

शिक्रापूर पोलिसांची कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

शिक्रापूर पोलिसांची कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

शिक्रापूर; प्रतिनिधि

पुणे शहरालगतच्या शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असताना गुन्हेगारी प्रवृत्तींनाही आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांचे आदेशाने स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गणेश भाऊसाहेब फडतरे (वय ३५, रा.फडतरेवस्ती,कोरेगाव भीमा, ता.शिरूर,जि.पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर व लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवून अग्निशस्त्रासह हल्ला करणे, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी तसेच बालकाचे अपहरण करून मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांचे आदेशावरून आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर अभिलेख तपासून त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावातील पुरावे व गुन्हेगारी स्वरूप विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश फडतरे यास ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला ताब्यात घेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक गायकवाड सध्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे जितेंद्र पानसरे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार रोहिदास पारखे अमोल दांडगे श्रीमंत होणमाने शिवाजी चितारे मच्छिंद्र निश्चित राम जाधव नारायण वाळके या कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button