क्राईम रिपोर्ट

बारामती विभागात दरोडेखोरांचा ‘नाईट ऑपरेशन’ फसला २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस.

बारामती विभागात दरोडेखोरांचा ‘नाईट ऑपरेशन’ फसला
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस.

बारामती वार्तापत्र

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि दौंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे.

एकाच रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकून नागरिकांना बेदम मारहाण करणाऱ्या या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस आले असून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून दौंड, बारामती आणि जुन्नर परिसरात एकाच पद्धतीने दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या घटना घडत होत्या.

दरोडेखोर रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसून नागरिकांना मारहाण करत, धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लुटत होते. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

१० जून २०२६ रोजी मध्यरात्री दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोरवडी गावातील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती तसेच शेजारील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी थैमान घातले होते. सहा ते सात जणांच्या टोळीने नागरिकांना बेदम मारहाण करून सुमारे ७ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या घटनेनंतर दौंड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तपासासाठी सहा विशेष पथके नियुक्त केली.

पोलिसांनी घटनास्थळापासून ५० किलोमीटर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १३ जून रोजी रात्री बाभुळगाव खालसा (ता. कर्जत) आणि चिखली (ता. आष्टी, जि. बीड) येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

या कारवाईत गणेश मंगेश काळे, विशाल हंबरड्या काळे आणि किशोर रावण भोसले यांना अटक करण्यात आली. तसेच एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले. टोळीचा प्रमुख साथीदार प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले याच्यासह इतर काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

अटक आरोपींकडून पोलिसांनी १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाईल, मोटारसायकल आणि इतर साहित्य असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चौकशीदरम्यान आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याचे ४, जबरी चोरीचे ६ आणि घरफोडीचे ५ असे १५ गुन्हे कबूल केले. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोड्याचे ३, जबरी चोरीचे ३ आणि घरफोडीचे २ असे आणखी ८ गुन्हे उघडकीस आले.

त्यामुळे एकूण २० गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Back to top button