विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या बारामतीतील भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा
लग्नासारखा विधी करून, फोटो काढून ते पूजा करण्यासाठी सडा वाघापुर येथील देवीसमोर ठेवावे लागतील.

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या बारामतीतील भोंदूबाबाला १० वर्षांची शिक्षा
लग्नासारखा विधी करून, फोटो काढून ते पूजा करण्यासाठी सडा वाघापुर येथील देवीसमोर ठेवावे लागतील.
बारामती वार्तापत्र
घरातील लोकांचे आजारपण दूर करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार केल्याबद्दल भोंदूबाबा महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय ४२, रा. शिर्सुफळ, ता.बारामती, जि. पुणे) यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३८ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश एम.एस. भदाणे यांनी शिक्षा ठोठावली.
महिलेच्या घरातील लोकांचे आजारपण दूर करणे, मेंढ्या मरू न देण्यासाठी होम-हवन करावा लागेल. तुमच्यावर लोकांनी करणी केली आहे, त्यासाठी विधी करावा लागेल, असे सांगून आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे जादूटोणा केला. महिला सतत आजारी पडत असल्याने तिला बरे करण्यासाठी एक पूजा करावी लागेल, त्यासाठी आरोपी व पीडिता यांचे एकमेकांच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घातलेले फोटो लागतील.
त्यासाठी लग्नासारखा विधी करून, फोटो काढून ते पूजा करण्यासाठी सडा वाघापुर येथील देवीसमोर ठेवावे लागतील. त्यानंतर पैशाचा पाऊस पडेल. असे सांगून पीडितेच्या वडिलांकडून ५५ हजार रूपये स्वीकारून आर्थिक शोषण व फसवणूक केली. आरोपीने पीडितेसोबत पूजेसाठी काढलेल्या फोटोचा गैरवापर करून अत्याचार केला.
पिडितेने पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रकार व जादूटोणा यांना प्रतिबंध करणेकरीता व त्यांचे समूळ उच्चाटनाकरीता अधिनियम २०१३ तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपनिरिक्षक एच.एन. उगले यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता, तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी काम सरकारतर्फे काम पाहिले.पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण व पोलिस अंमलदार आर.डी.आडसूळ यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.






