सुनेत्रावहिनी पवार ॲक्शन मोडवर! पाहणीनंतर बारामती मेडिकल कॉलेजमध्ये मोठी खांदेपालट
पाहणीदरम्यान काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

सुनेत्रावहिनी पवार ॲक्शन मोडवर! पाहणीनंतर बारामती मेडिकल कॉलेजमध्ये मोठी खांदेपालट
पाहणीदरम्यान काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीनंतर आरोग्य प्रशासनात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. महस्के तसेच प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची बदली करण्यात आल्याने बारामतीच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रावहिनी पवार यांनी रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान रुग्णसेवा, स्वच्छता, प्रशासन, औषध उपलब्धता, विविध विभागांचे कामकाज आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा सखोल आढावा घेतला होता. पाहणीदरम्यान काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर दिला होता.
या भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच डीन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाल्याने या निर्णयाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. प्रशासनातील जबाबदारी आणि कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश या कारवाईतून गेल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, महाविद्यालयाच्या नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. किरणकुमार जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बारामतीतील नागरिक, सामाजिक संघटना आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून या बदलांचे स्वागत करण्यात येत आहे. आरोग्य व्यवस्थेमध्ये अधिक उत्तरदायी व परिणामकारक प्रशासन उभे राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘पाहणी आणि तातडीचा निर्णय’ ठरली चर्चेची बाब
विकासकामांबरोबरच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तेबाबत सुनेत्रावहिनी पवार स्वतः लक्ष घालत असल्याचे या घडामोडींमधून अधोरेखित झाले आहे. केवळ पाहणीपुरते न थांबता आवश्यक ठिकाणी तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“आरोग्यसेवा दर्जेदार, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही,” असा संदेश या प्रशासकीय बदलांतून गेल्याची चर्चा सध्या बारामती शहरात रंगली आहे.






