स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामतीसाठी मेडिकोज गिल्डचा पुढाकार; स्व धनंजयभाऊ चौक–खंडोबा नगर मार्गावर विशेष स्वच्छता अभियान
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामतीसाठी मेडिकोज गिल्डचा पुढाकार; स्व धनंजयभाऊ चौक–खंडोबा नगर मार्गावर विशेष स्वच्छता अभियान
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य
बारामती वार्तापत्र
स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामतीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने बारामती मेडिकोज गिल्ड आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक ८ व १० मध्ये विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वर्गीय धनंजयभाऊ चौक ते खंडोबा नगर रोड या मार्गाच्या दोन्ही बाजूंवरील मोठ्या प्रमाणातील कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, बांधकाम सभापती अमर धुमाळ, नियोजन सभापती जयसिंग काटे-देशमुख, नगरसेविका मनीषा बनकर, बारामती मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. गोकुळ काळे, उपाध्यक्ष डॉ. अंजली खाडे, डॉ. केतकी नाळे, डॉ. संदीप शहा यांच्यासह अनेक डॉक्टर, नगरपरिषदेचे अधिकारी आणि नागरिक सहभागी झाले.
बारामती मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. गोकुळ काळे हे केवळ वैद्यकीय सेवेतच नव्हे, तर त्यांच्या रुग्णालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही सातत्याने राबवत आहेत. स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि समाजोपयोगी कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने या अभियानालाही विशेष बळ मिळाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत, शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या अभियानामुळे परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात आली.






