पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उघडी; माळेगावच्या निवडणुकीत पैशांच्या वाटपाचा आरोप, बारामतीतील राजकारण पेटलं
CCTV फुटेज आम्हाला द्यावेत

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उघडी; माळेगावच्या निवडणुकीत पैशांच्या वाटपाचा आरोप, बारामतीतील राजकारण पेटलं
CCTV फुटेज आम्हाला द्यावेत
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे. बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल अकरा वाजेपर्यंत सुरु होती. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे.
बारामती शहरातील आमराई येथील जिल्हा बॅंकेची मुख्य शाखा बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. ही माहिती मिळाल्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. यावेळी रंजनकुमार तावरे यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मिळून आल्याचं सांगत या बॅंकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
तसेच रंजनकुमार तावरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. सुनील मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले. अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं..? असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचं काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला.
पैशांच्या जोरावर सभासदांना खरेदी करण्याचा हा प्रकार आम्ही कदापिही सहन करणार नाही. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत आहोत. सभासद, त्याचे नातेवाईक आणि यामागे जबाबदार व्यक्तींची नावं अशी यादीच या ठिकाणी मिळून आली आहे.. अशा पद्धतीने याद्या तयार करण्यामागचे गौडबंगाल नेमके काय असा प्रश्न तावरे यांनी उपस्थित केला.
शासकीय यंत्रणेचा गैरवापर ?
डूबल नावाचे जलसंपदा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरही या घडामोडीत सहभागी आहेत. ते बारामतीतच मुक्काम ठोकून पाणी वापर संस्थांवर दबाव टाकत होते. ज्यांनी मदत केली नाही त्यांचं पाणी बंद करण्याची धमकी देण्यात आली. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका काय असा प्रश्न विचारत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
त्याचबरोबर, काही शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनाही या निवडणुकीत कामाला लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं तावरे यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकाराचा CCTV फुटेज आम्हाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा पोलिस घटनास्थळी आले होते. सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या या आरोपांमुळे बारामतीतील राजकारण अधिकच तापले असून जिल्हा बँकेभोवती संशयाचे वलय तयार झाले आहे. या प्रकरणावर आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट;
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा
जिल्हा बॅंक रात्रीच्या वेळी सुरु ठेवल्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधीही या ठिकाणी पोहोचले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येवून माध्यमांच्या प्रतिनिधींना अरेरावीची भाषा वापरली. तसेच माळेगावमधील विरोधकांवरही अरेरावीचा प्रयत्न केला. त्यामुळं हे प्रकरण अधिकच पेटल्याचं पहायला मिळाले.