बारामती–कुरकुंभ–दौंड परिसर हादरवणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश कोयत्याच्या धाकाने लूटमार; बारामती तालुका पोलिसांची थरारक कामगिरी
भारतीय न्याय संहिता कलम ३१० व ३११ अन्वये गुन्हा दाखल

बारामती–कुरकुंभ–दौंड परिसर हादरवणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश कोयत्याच्या धाकाने लूटमार; बारामती तालुका पोलिसांची थरारक कामगिरी
भारतीय न्याय संहिता कलम ३१० व ३११ अन्वये गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
भिगवण–बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा (ता. बारामती) येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने लूटमार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय १८, मूळ रा. उमरड, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. शारदानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कंपनीच्या कॅरी गाडीतून प्रवास करत असताना दि. ७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक रस्त्यात आडवे जाऊन त्यांची गाडी अडवली.
हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले व जबरदस्तीने लूटमार करण्यात आली.
या हल्ल्यात स्कायबॅग कंपनीची जांभळ्या रंगाची बॅग, काळ्या रंगाची बॅग, चालकाचा मोटोरोला कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल, रेडमी कंपनीची पॉवर बँक, एटीएम कार्ड, विविध कागदपत्रे व रोख रक्कम असा सुमारे १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला.
टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सुमित सूर्यवंशी यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली. माहिती मिळताच यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचे वर्णन व वापरलेल्या वाहनांच्या आधारे तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. भिगवण, दौंड व यवत पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.
मोटारसायकल व रिक्षाच्या मदतीने पळून जाणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला–सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. यावेळी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुढील शोधमोहीमेत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या टोळीने कुरकुंभ येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र महेश खडके (वय २६) यांच्यावरही कोयत्याने गंभीर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा राजू मोरे (मार्केट यार्ड, पुणे), रुपेश सुरेश आडवाल (रासकर पार्क, कात्रज), संकेत अनंत शिलते (पर्वती दर्शन, पुणे) व ईश्वर महादेव मिसाळ (खोपडे नगर, कात्रज) यांचा समावेश आहे.
या कारवाईसाठी निरगुडे, भिगवण व कुरकुंभ परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून दहशत माजवणाऱ्या टोळीवर वेळेत कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याबद्दल बारामती तालुका पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१० व ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली.
दरम्यान, रस्त्यावरून प्रवास करताना संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा ११२ या क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले आहे.






