स्थानिक

बारामतीत शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी

बारामतीत शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी

बारामती वार्तापत्र

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वाभिमानाचे जाज्वल्य प्रतीक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना लाखो हिंदूंची कत्तल करणारा व महिलांवर अत्याचार करणारा हिंदू धर्माची देवस्थाने उध्वस्त करणारा व हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्म परिवर्तन करणारा धर्मविरोधी टिपू सुलतान यांच्याशी करून त्यांना समकक्ष ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.

तसेच मालेगाव येथील उपमहापौर शान निहाल अहमद यांनी त्यांच्या सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व इतर राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे न लावता केवळ धर्मविरोधी टिपू सुलतान यांचे छायाचित्र प्रदर्शित केल्याच्या घटनेमुळे समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा गौरवशाली इतिहास, न्यायनिष्ठ राज्यकारभार व सर्वधर्मसमभावाची परंपरा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. अशा थोर राष्ट्रनायकांची कोणत्याही वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तीशी तुलना करणे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच देणारी बाब असल्याची भावना शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर बारामती येथे शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीने संविधानिक मार्गाने शांततामय निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अस्मितेची जाज्वल्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली व त्यानंतर जाहीर निषेध सभा घेण्यात आली.

सदर सभेत संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ, २९५-अ व ५०५(२) अन्वये गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान राखला जावा, हीच या आंदोलनामागील भूमिका असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध द्वेष पसरविण्यासाठी नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण व ऐतिहासिक सत्याचा सन्मान राखण्यासाठी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Back to top button